14.7 C
Latur
Friday, November 14, 2025
Homeराष्ट्रीयरस्त्यात अडवून पत्नीचे चाकूने नाक कापले

रस्त्यात अडवून पत्नीचे चाकूने नाक कापले

परिसरात खळबळ

ग्वाल्हेर : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरातून एक अत्यंत लाजिरवाणी आणि धक्कादायक घटना समोर आली. चारित्र्यावर संशय घेऊन एका व्यक्तीने आपल्या पत्नीला रस्त्यात अडवले, तिला शिवीगाळ केली आणि नंतर धारदार चाकूने तिचे नाक कापले. या घटनेनंतर आरोपी पतीने तिला जीवे मारण्याची धमकी देऊन घटनास्थळावरून पळ काढला. आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्वाल्हेर पोलिस स्टेशन परिसरातील हॉटेल फ्लिनसमोर ही संतापजनक घटना घडली. पीडित महिला तिच्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर रामतापुरा येथील चार शहर नाका येथे भाड्याच्या खोलीत राहत होती. घटनेच्या दिवशी पीडित महिला काही कामासाठी तानसेन नगरमधील लक्ष्मी डेअरीकडे जात होती. ती हॉटेल फ्लिनसमोर पोहोचताच तिचा पती मागून तिथे आला आणि त्याने तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. महिलेने जाब विचारताच आरोपीने तिला मारहाण केली आणि आपल्या सोबत आणलेल्या चाकूने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पीडित महिलेचे नाक कापले गेले.

घटनेची माहिती मिळताच ग्वाल्हेर पोलिस स्टेशनचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जखमी महिलेला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, तिचा पती तिच्या चारिर्त्यावर सतत संशय घेत असे आणि दररोज यावरून त्यांच्यात मोठे वाद होत होते. या रोजच्या त्रासाला कंटाळून ती आपल्या मुलीसह घर सोडून वेगळी राहत होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR