छत्रपती संभाजीनगर : केरळमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा सावध झाली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महापालिकेने सर्व आरोग्य केंद्रांत कोरोना चाचणीची व्यवस्था केली आहे. बुधवारी दिवसभरात ५१ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी २० जणांचे अँटीजेन चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले, तर ३१ जणांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली.
केरळमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांना सावधगिरीचा आदेश दिला आहे. त्यानुसार राज्य सरकारनेही आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेनेही त्या दृष्टीने तयारी केली आहे.
पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा म्हणाले, ‘पालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांमधून कोरोना चाचणी केली जाणार आहे. तसे आदेश सर्व आरोग्य अधिका-यांना देण्यात आले आहेत. आरोग्य केंद्रांमध्ये सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत कोरोना चाचणी केली जाणार आहे. मेल्ट्रॉन हॉस्पिटल आणि ईओसी पदमपुरा या ठिकाणी मात्र रात्री आठपर्यंत कोरोना चाचणी केली जाणार आहे. महापालिका सध्या करोना चाचणीवर भर देत आहे.’
कोविव्हॅटचे दोनशे डोस
पालिकेकडे सध्या इन-कोविव्हॅटच्या दोनशे लसींचा साठा शिल्लक आहे. प्रिकॉशन डोस म्हणून १८ वर्षांवरील नागरिकांना ही लस दिली जाणार आहे. त्याशिवाय पालिकेने कोव्हिशिल्ड, कोवॅक्सिन व कोब्रोव्हॅक्स लसीची मागणी सरकारकडे केली आहे.