परभणी : धर्म, संस्कृती, परंपरा यांची बीजे समाजमनात खोलवर रुजलेली असतात. समाजाने दिलेल्या भूमिकांमधील दुटप्पीपणा, पोकळपणा, दांभिकता व स्वार्थ लक्षात येत गेल्यावर स्त्रियांनी त्या विरोधात बंडाचा झेंडा उभारला. केवळ चूल आणि मूल एवढेच स्त्रीचे कार्यक्षेत्र नाही. सहकार्य मिळाले तर संसार सांभाळूनही स्वत:चे करिअरही करता येते.
पुरुषांइतकीच स्त्रीलाही स्वत:ची ओळख पटणे जरूरी आहे. मी कोण या प्रश्नापासून स्त्रीचा मी मला हवे ते होऊ शकते या आत्मविश्वासाकडे झालेला प्रवास सोपा नाही. अन्याया विरुद्ध आवाज उठविण्याची मानसिक ताकद असणे, संघर्ष करणे, स्वत:ला समाजाच्या मध्यप्रवाहात एक व्यक्ती म्हणून संस्थापित करणे इ. पाय-या चढत स्त्री आत्मनिर्भर होऊ शकते, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडी विभागीय प्रवक्ता डॉ. धर्मराज चव्हाण यांनी केले.
वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने मनुस्मृती दहन व स्त्रीमुक्ती दिनाचा कार्यक्रम दि. २५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथी म्हणून बोलताना डॉ. धर्मराज चव्हाण यांनी स्त्रीमुक्ती चळवळी संदर्भात भूमिका विशद केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला जिल्हाध्यक्ष सुनीताताई साळवे होत्या. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक वैशाली ताजने, सुनिता पाटील आणि भास्कर भोजने, डॉ. सुरेश शेळके, डॉ. निकाळजे, धम्मपाल सोनटक्के, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर दिपके, जिल्हा सचिव तथा सरपंच ढगे पिंपळगाव गौतम रणखांबे, दिलीप मोरे, अविनाश सावंत, मानवत तालुका अध्यक्ष घुगे, संदीप खाडे यांच्यासह महीला पदाधिकारी, महिला मंडळ वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वंचित बहुजन महिला आघाडी परिश्रम घेतले.