नवी दिल्ली/पुणे : हवामान खात्याने रविवारी देशभरात अलर्ट जारी केला असून पुढील ३ दिवस देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला असून त्याच वेळी, उत्तराखंड, पूर्व मध्य प्रदेश, सौराष्ट्र-कच्छ, मध्य महाराष्ट्र, कोकण-गोवा, कर्नाटक, केरळ, आसाम, मेघालय, सिक्कीम, अरुणाचल प्रदेशाला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी, रुद्रप्रयागमध्ये रात्रभर झालेल्या पावसामुळे १६०० हून अधिक चारधाम यात्रेकरूंना बाहेर काढण्यात आले. पावसामुळे डोंगरावरून मोठे दगड पडले आणि गौरीकुंडजवळील केदारनाथकडे जाणारा रस्ता बंद झाला. ७०० यात्रेकरूंना बाहेर काढण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे.
दरम्यान, ओडिशा सरकारने शनिवारी बालासोर, भद्रक आणि जाजपूरमधील अधिका-यांना हाय अलर्टवर ठेवले आहे. अनेक नद्या पूर आल्या आहेत, त्यामुळे लोकांना सखल भागातून स्थलांतर करण्यास सांगण्यात आले आहे. जलका आणि बैतरणी नद्यांच्या पाण्याची पातळी आधीच धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर बालासोरमधील सुवर्णरेखा नदीच्या पाण्याची पातळी सतत वाढत आहे.
महाराष्ट्र जलमयची शक्यता
महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये भारतीय हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशा-यानुसार आज कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भमध्ये जोरदार पाऊस होईल. जळगावात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांमध्ये पाणी साचले असून रस्ते जलमय झाली आहेत. महाराष्ट्रातली काही भागांत २४ तास पाऊस सतत राहण्याची शक्यता आहे. कोकण घाटमाथा आणि विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. रायगडसह पुणे आणि साता-याच्या घाटमाथ्यावर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा(ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
दक्षिणेकडे ५ दिवस धोक्याचे
दक्षिणेकडील केरळ राज्यात पुढील ५ दिवस पाऊस सुरूच राहण्याची शक्यता आहे. यासोबतच रविवारपर्यंत ५०-६० किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहू शकतात. जोरदार वारे आणि खवळलेल्या समुद्रामुळे केरळ-कर्नाटक-लक्षद्वीप किना-यांवर ३० जुलैपर्यंत मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
हिमाचलमध्ये अतिमुसळधार
हिमाचल प्रदेशनेही २९ जुलैपर्यंत चंबा, कांगडा, मंडी आणि कुल्लू या चार जिल्ह्यांतील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

