हिंगोली/प्रतिनिधी
जिल्ह्यात आता कोरोनाने ग्रामीण भागात हातपाय पसरवण्यास प्रारंभ केला आहे़ दररोज कोरोना बाधितांची संख्या वाढत असून काल उशीरा रात्री आलेल्या अहवालात आणखी तीन जणांना कोरानाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे़ यामुळे जिल्ह्यात कोरोनाचे भय दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
हिंगोलीत मागील चार दिवसापासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला असून काल सकाळी एका ११ वर्षीय बालकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले़ यानंतर रात्री उशीरा आलेल्या अहवालात आणखी तीन रुग्णांची वाढ झाली़ यात दोन रुग्ण औंढा तालुक्यातील असून ते मुंबई येथून सुरेगाव येथे दाखल झाले होते़ दोन्ही रुग्ण सुरेगावातील शेतात क्वारंटाईन होते असे सांगीतले जात आहे़ तर एक हट्टा येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्या २९ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली आहे़ हा युवक देखील मुंबईहून आला होता़ यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना ग्रस्तांचा आकडा ७४ वर गेला आहे.
Read More सीमेवरच्या वाढत्या तणावात ड्रॅगनने नांगी टाकली
आजपर्यंत जिल्ह्यात १६४ रुग्णांना कोविड १९ ची लागण झाली होती़ यातील ९० रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे़ सद्यस्थितीत ७४ रुग्ण उपचार घेत आहेत़ यातील ८ रुग्ण कळमनुरी केअर सेंटरमध्ये, १२ रुग्ण सेनगाव केअर सेंटरमध्ये, २९ रुग्ण हिंगोलीतील लिंबाळा येथील केअर सेंटरमध्ये, १४ रुग्ण वसमत तर दोन रुग्ण औंढा येथे उपचार घेत असून एक रुग्ण एसआरपीएफचा जवान औरंगाबाद येथील धुत हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहे़ सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून कोणत्याही प्रकारणी गंभीर लक्षणे नाहीत़ येथील सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात ८ रुग्णावर उपचार सुरु आहेत़ यात दोन औंढा येथील, एक भिरडा येथील, एक सुरजखेडा येथील, एक कनेरगाव येथील समुदाय आरोग्य अधिकारी, दोन पहेणी, एक माझोड येथील रुग्णावर उपचार सुरु आहेत़
जिल्ह्यातील १५९ अहवाल प्रलंबित
येथील आयसोशलेन वार्ड व जिल्ह्यातील सर्व कोरोना केअर सेंटरमध्ये आतापर्यंत २०७४ संशयीतांना दाखल करण्यात आले होते़ त्यापैकी १६६४ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत़ १५६९ व्यक्तींना डिस्चार्ज दिला आहे़ सद्यस्थितीला ४९९ संशयीत व्यक्ती क्वारंटाईन सेंटरमध्ये भरती असून १५९ जणांचे अहवाल येणे प्रलंबित आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ़ किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली़