हिंगोली/प्रतिनिधी
गेल्या वीस दिवसापासून जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबई वरून हिंगोली जिल्ह्यात परतलेल्या अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. आता पुन्हा रविवारी ७ जून रोजी सेनगाव तालुक्यातील ७ व औंढा येथील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या २०० वर जाऊन पोहोचली आहे. तर सद्या कोरोना बाधित ३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सेनगाव येथील क्वारंटाईन सेंटर मध्ये भरती असलेल्या ७ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. ह्या सर्व व्यक्ती मुंबईवरून सेनगाव येथे आल्या आहेत. तर औंढा नागनाथ येथील एका ३७ वर्षीय व्यक्तीला निमोनिया झाल्याने औरंगाबाद येथील धूत हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले होते. काल शनिवारी त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे सदरील रुग्णांचा अहवाल हिंगोलीत निगेटिव्ह आला होता.
Read More उलट सुलट चर्चेला उधाण : दुकानाला आग, डॉक्टरचा होरपळून मृत्यू
आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात कोविड -१९ चे एकूण २०० रुग्ण झाले आहेत. यापैकी १६३ जण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आहे. सद्या कोरोना बाधित ३७ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. वसमत येथे १४ व हिंगोली येथील आयसोलेशन वार्डमध्ये २२ रुग्ण दाखल आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर असून कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत.
आतापर्यंत आयसोलेशन वार्ड व जिल्ह्यातील सर्व कोरोना केअर सेंटर मध्ये एकूण २ हजार ४८४ जणांना संशयित म्हणून भरती केले होते. यापैकी २ हजार १३८ जण निगेटिव्ह आले आहेत. २ हजार १९० जणांना घरी सोडले आहे. तर २७५ जण भरती आहेत. अजूनही ९७ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. हिंगोली जिल्ह्यात रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांनी सामाजिक अंतर, मास्क वापरणे, सैनिटायझरचा वापरून स्वत:ची व कुटुंबीयांची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.