29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeहिंगोलीव्यापा-यांनी उघडलेली दुकाने प्रशासनाने केली बंद!

व्यापा-यांनी उघडलेली दुकाने प्रशासनाने केली बंद!

एकमत ऑनलाईन

हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शासनाने लागू केलेल्या संचारबंदीत व्यापा-यांची कोंडी होत असल्याने सोमवारी (दि.१२) शहरातील व्यापा-यांनी प्रशासनाचा विरोध झुंगारून दुकाने उघडली होती. परंतु, कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे, वाढती रूग्णसंख्या रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेले नियम पाळणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन पोलीस, नगर पालिका व महसूल प्रशासनाच्या अधिका-यांनी महात्मा गांधी चौकात येवून केले. त्यानंतर व्यापा-यांनी आपली प्रतिष्ठाणे बंद केली. तर शासन नियमाप्रमाणे वैद्यकीय सेवा, किराणा व ऑनलाईन सर्व्हिसेस सेंटर सुरू होते.

हिंगोली जिल्ह्यात मागील महिन्याभरापासून कोरोनाच्या दुस-या लाटेने उद्रेक केला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात ११९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, बाधितांची संख्या ८ हजार ४२७ वर पोहचली आहे. त्यातील ७ हजार ४२० रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या ८८८ रूग्णांवर ठिकठिकाणच्या कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

कोरोनामुळे सध्या जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण होत असल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. आरोग्य विभागासह पोलीस प्रशासन, महसूल, नगर पालिका प्रशासनाकडून सामाजिक अंतर, मास्कचा वापर तसेच कोरोना रोखण्यासाठीच्या नियमाचे पालन व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी अनेक वेळा कठोर भूमिकाही घेण्यात येत आहे. ९ एप्रिलपासून राज्य शासनाकडून विकेण्ड लॉकडाऊन केले आहे. शनिवार आणि रविवारी वैद्यकीय सेवा व किराणा वगळता बाजारपेठ कडकडीत बंद होती. परंतु, संचारबंदीचा व्यापारी, कामगारांसह शेतकरी आणि सर्व सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात बसत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाकडून तीन दिवसांपुर्वी जिल्हा प्रशासनालाच अल्टिमेटम देण्यात आला होता. सोमवारपासून व्यापारी दुकाने उघडतील असा इशारा देण्यात आल्यानंतर या दिवशी सकाळी ९ पासूनच मुख्य बाजारपेठ असलेल्या महात्मा गांधी चौक, जवाहर रोड, इंदिरा गांधी चौकातील कापड दुकाने, कृषीकेंद्रासह बहुतांश दुकाने उघडण्यात आली. प्रशासनाने विरोध करू नये म्हणून बाजारपेठेत व्यापारी महासंघाचे पदाधिकारी, सदस्यही उपस्थित राहिले होते. परंतु, दुपारी १ च्या सुमारास पोलीस, नगर पालिका व महसूल प्रशासनाच्या अधिका-यांनी महात्मा गांधी चौक गाठून व्यापा-यांशी चर्चा केली.

सध्या कोरोनामुळे परिस्थिती गंभीर बनली असून, या काळात सर्वांनी सहकार्य करणे, खबरदारी घेणे अत्यावश्यक असल्याचे सांगण्यात आले. शासनाने घालून दिलेले नियम प्रत्येकाला पाळावेत असे आवाहन करण्यात आल्यानंतर व्यापा-यांनी आपली प्रतिष्ठाणे बंद केली. दरम्यान, व्यापा-यांनी पोलीस ठाणेही गाठले होते. तेथे आ.संतोष बांगर यांनी व्यापा-यांची भेट घेवून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले. व्यापा-यांनी आवाहनास साद देत आपली प्रतिष्ठाणे बंद ठेवली.

आशेची गुढी उभारू या!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या