हिंगोली (प्रतिनिधी) : औंढा नागनाथ तालुक्यातील आजरसोंडा येथील महिलांची तक्रार घेऊ नये, यासाठी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत पोलिस चौकीजवळ आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आजरसोंडा येथील शेषराव साहेबराव जोंधळे यांच्या विरुद्ध अवैधरित्या दारू विक्रीबाबतचा आरोप करीत गावातील महिला जवळा बाजार पोलिस चौकीत २४ मे रोजी रात्रीच्या सुमारास आल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिसांनी जोंधळे यास जवळाबाजार पोलिस चौकीत चौकशीसाठी बोलावले होते. यावेळी जोंधळे याने पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत माझ्याविरोधात तक्रार घेतल्यास मी जीव देतो व एकेकाची वाट लावतो अशी धमकी पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यावर त्याने चौकी बाहेर येऊन काडीने शर्टला आग लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी जमादार सचिन सांगळे यांच्या फिर्यादीवरून शेषराव साहेबराव जोंधळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.