हिंगोली : राज्यात गाईच्या दुधाला दहा रुपये दर वाढवून द्यावा यासह इतर मागण्यांसाठी आज १ ऑगस्ट रोजी महाराजा अग्रसेन चौकात आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. आंदोलक आमदारासह भाजपा कार्यकर्त्यांना शहर पोलिसांच्या पथकाने अटक करीत सायंकाळी सुटका केली.
हिंगोली शहरातील महाराजा अग्रसेन चौकात भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सकाळी अकरा वाजता आंदोलन सुरु केले. यावेळी बाजार समिती संचालक प्रशांत सोनी, मिलिंद यंबल, अॅड. के.के. शिंदे, बाजार समिती सभापती हरिश्चंद्र शिंदे, उमेश नागरे, संजय ढोके, डॉ. वसंतराव देशमुख, अॅड. अमोल जाधव, रिपाईचे मराठवाडा अध्यक्ष दिवाकर माने, श्याम खंडेलवाल, बाबा घुगे, हमिद प्यारेवाले यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यामध्ये गाईच्या दुधाचा दर १० रुपये वाढवून द्यावा तसेच दूध भुकटीसाठी ५० रुपये किलो प्रमाणे अनुदान द्यावे यासह इतर मागण्या मांडण्यात आल्या. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. भाजपच्या आंदोलनामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अखील सय्यद, जमादार शेख खुद्दुस, लक्ष्मीकांत माखणे यांच्यासह पोलिस पथकाने आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह भाजपा पदाधिका-यांना अटक करून शहर पोलीस ठाण्यात नेले. दुपारी उशिरापर्यंत त्यांना पोलीस ठाण्यातच स्थानबद्ध करून ठेवण्यात आले. सायंकाळी आंदोलकांची सुटका करण्यात आली.
दरम्यान दुध दरवाढीच्या मागणीसाठी जिल्ह्यात वसमत येथे जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव, औंढा येथे पाडुरंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरजीतसिंग ठाकुर, बबन सोनुने, सुनिल देशमुख, शरद पाटील सह पदाधिकारी उपस्थीत होते.
कळमनुरीत भाजपाचे दुध दरवाढीसाठी आंदोलन
कळमनुरीत भाजपाच्या वतीने दुध उत्पादक शेतक-यांच्या गाईच्या दुधाला प्रति लिटर १० रुपये अनुदान व दुध पावडर ला प्रति किलो ५० रुपये अनुदान मिळावे या मागणीसाठी माजी आ. गजानन घुगे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
भाजपाच्या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक तब्बल दिड तास विस्कळीत झाली होती. आंदोलनात रस्त्यावर दूध सांडून आघाडी सरकारचा निषेध केला. यावेळी विलास भोसकर, दामुअण्णा शिंदे, प्रकाश नाईक,अशोक मस्के, बाळासाहेब नाईक, इंदुबाई राऊत, भागवत ठाकूर ,उमेश सोमानी सह पदाधिकारी उपस्थितीत होते. दरम्यान पदाधिका-यांना अटक करत सुटका करण्यात आली.