हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील कामठा शिवारात एका तरुण शेतक-याने सततच्या नापिकीला कंटाळून झाडाला गळफास घेतला. ही घटना रविवारी ता. २९ दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. गोपाळ रामराव मोरे २२ असे या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील कामठा येथील गोपाल मोरे यांना कामठा शिवारात एक एकर शेत आहे. घरी आई, वडिल व भाऊ असा परिवार असून शेतातील उत्पन्नावर तसेच गोपाळ व इतर कुटुंबियांकडून केल्या जाणा-या रोजमजूरीवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. दरम्यान, आज सकाळी ११.०० वाजण्याच्या सुमारास गोपाळ मोरे हे कामठा शिवारातील एका शेतक-याच्या शेतात ट्रॅक्टरने मशागतीच्या कामावर गेले होते. दुपारपर्यंत सुमारे एक ते दीड एकर शेतात ट्रॅक्टरने मशागत केल्यानंतर त्यांनी र्धुयालगत ट्रॅक्टर उभे केले अन त्यानंतर झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर प्रकार बाजूला असलेल्या शेतर्कयांच्या लक्षात आल्यानंतर या घटनेची माहिती तातडीने आखाडा बाळापूर पोलिसांना देण्यात आली.
सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार शाहेद, बाजार समितीचे संचालक भारत देसाई यांच्या पथकाने घटनास्थळी घाव घेतली. पोलिसांनी मृत गोपाळ मोरे यांचा मृतदेह खाली उतरवून उत्तरीय तपासणीसाठी आखाडा बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे.
दरम्यान, मृत गोपाळ मोरे हे सततची नापिकी तसेच हाताला काम मिळत नसल्याने आर्थिक अडचणीत होता. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न त्याच्या समोर उभा होता. या परिस्थितीला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे सुत्रांनी सांगितले. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.