जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या 161; 71 रुग्णांवर उपचार सुरू
हिंगोली : हिंगोली तालुक्यातील पहेनी येथील 11 वर्षीय मुलाचा तर मुंबईहून आलेल्या 30 वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या 161 झाली आहे. त्यापैकी 90 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 71 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
हिंगोली शहरासह जिल्ह्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि अन्य मोठ्या शहरांमध्ये कामानिमित्त असलेले नागरिक गावाकडे परतत आहेत. हिंगोली तालुक्यातील मुंबईहून आलेल्या 30 वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी अहवाल 25 मे रोजी रात्री पॉझिटिव्ह आला आहे. तर मंगळवारी विलगीकरण कक्षात असलेल्या हिंगोली तालुक्यातील पहेनी या गावातील 11 वर्षीय मुलाला कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले आहे.
Read More अभिजित बॅनर्जींचा सरकारला सल्ला : प्रत्येक नागरिकाला महिन्याला 1 हजार रूपये द्या
सध्या औरंगाबादला एक तर हिंगोली जिल्ह्यात 70 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्ड व विविध कोरोना केअर सेंटरमध्ये 1 हजार 953 व्यक्तींना भरती करण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 649 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 1 हजार 547 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या 401 व्यक्ती भरती असून 210 अहवाल प्रलंबित असल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रशासनाने कळवले आहे. जिल्हा प्रशासनाने पहेनी हे गाव कंटेनमेंट क्षेत्र म्हणून घोषीत केले.