18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeहिंगोलीपिकविम्याच्या नावाखाली शेतक-यांची लूट : राहुल गांधी

पिकविम्याच्या नावाखाली शेतक-यांची लूट : राहुल गांधी

एकमत ऑनलाईन

कळमनुरी(हिंगोली) : मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मागील आठ वर्षात शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्गाचे अपरिमित नुकसान झाले आहे. मनरेगाचा रोजगार मिळत नाही, कामगारांच्या हाताला काम नाही, पैसाही नाही. शेतात राबराब राबणा-या शेतकरी देशोधडीला लावला आहे. पीकविम्याच्या नावाखाली शेतक-यांकडून पैसे घेतले जातात पण नुकसान भरपाईपोटी शेतक-यांना दमडीही मिळत नाही, विमा कंपन्या शेतक-यांची खुलेआमपणे लूट करत आहेत, असा आरोप खासदार राहुल गांधी यांनी हिंगोली, कळमनुरीच्या चौक सभेत केला.

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे भारत जोडो पदयात्रेचा आजचा दिवस संपला. यावेळी चौकसभेत जनसमुदाला संबोधित करताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर चौफेर हल्ला चढवला. कळमनुरी भागात काही शेतक-यांशी संवाद साधताना त्यांनी शेतातील सर्व पीक वाया गेल्याचे दाखवले, सोयाबीन पुर्णपणे जळून गेले होते पण पीकविमा कंपन्याकडून नुकसान भरपाई मिळत नाही. कोणाकडे दाद मागावी हेही समजत नाही अशी अवस्था असल्याचे शेतक-याने सांगितले. मोदी सरकारच्या काळात शेतकरी व शेती संपवण्याचे काम केले जात आहे. शेतक-यांकडून विमाचे हप्त्यापोटी पैसे घेतले जातात पण नुकसान भरपाई मात्र मिळत नाही, मिळाली तर अत्यंत तुटपुंजी मिळते. मोदी सरकारमध्ये पीकविमा कंपन्या मालामाल झाल्या आहेत आणि शेतकरी मात्र कंगाल झाला आहे, अशी टीका राहुल गांधींनी केली.

राजीव सातव यांच्या आठवणींना उजाळा
राहुल गांधी यांनी यावेळी स्व. राजीव सातव यांच्या आठवणींना उजाळा दिला. राजीव माझे मित्र होते, काम चांगले करायचे, त्यांनी नेहमीच तुमच्यासाठी काम केले असे राहुल गांधी म्हणाले. तसेच देशात द्वेष पसरवला जात आहे, भांडणे लावली जात आहेत. पण या देशात द्वेष पसरवणा-यांना स्थान नाही, असे राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितले.

श्रीनगरमध्ये जाऊन तिरंगा फडकवूनच थांबणार
भारत जोडो यात्रा कन्याकुमारीहून निघाली असून श्रीनगरमध्ये जाऊन तिरंगा फडकवूनच थांबणार आहे. देशातील सर्वसामान्यांचे प्रश्न हाती घेऊन आम्ही ही पदयात्रा काढली असून तुमचे प्रेम व शक्तीच आम्हाला चालण्याची प्रेरणा देते, असेही राहुल गांधी म्हणाले. यावेळी व्यासपीठावर विधिमंडळ पक्षनेते व पदयात्रेचे समन्वयक बाळासाहेब थोरात, माजी मंत्री वर्षा गायकवाड, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, खा. रजनी सातव, प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी संपतकुमार, आमदार डॉ. प्रज्ञा सातव आदी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या