हिंगोली : शहरातील बहुतांश भागात कंटेनमेंट झोन लागू केला असले तरी नागरीक मात्र या भागात लावलेल्या बांबुमधून मुक्त संचार करत असल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाय योजना करण्यास प्रशासन असफल ठरत असल्याचे दिसत आहे.
एकीकडे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे़ २४ तासात ४ बळी गेले तरी देखील नागरीकांकडून सोशल डिस्टन्सींगच्या नियमाचे उल्लंघन केले जात आहे़ बाजारपेठेत नागरीक मास्कचा वापर देखील क्वचित करतांना दिसत आहे़ इतकेच नव्हे तर शहरात बहुतांश भागात कंटेनमेंट झोन घोषीत केले आहे़ या भागातील प्रत्येक हालचालीवर बंधण घातले आहेत़ या भागात नगर पालिकेकडून सेवा देण्याच्या सूचना असल्या तरी नागरीकांना आता कोरोनाचे भय राहिलेले नाही.
या भागात देखील लावलेल्या बांबुमधून नागरीक ये-जा करतांना दिसत आहेत़ वास्तविक पाहता कंटेनमेंट झोन भागात कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने प्रशासन उपाययोजना करत असले तरी नागरीक मात्र या उपाय योजनेला हरताळ फासतांना दिसत आहेत़ जुने ग्रामीण पोलीस ठाणे भागात बांबुच्या लगत भाजी विक्रेत्यांची दुकाने थाटली जात असून पर्यायी रस्ता असूनही मुद्याम नागरीक बांबुमधून मुक्तपणे संचार करतात.
सहकार्य करा, अन्यथा कारवाई- एसडीएम चोरमारे
हिंगोली शहरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून नागरीकांकडून मात्र स्वयंशिस्त पाळली जात नाही़ या संदर्भात आज एसडीएम कार्यालयात शहरातील उच्च पदस्थ अधिका-यांची बैठक घेवून खबरदारीच्या उपाय योजना करण्याच्या सूचना एसडीएम अतुल चोरमारे यांनी दिल्या़ नागरीकाकडून नियमाचे उल्लंघन होत असेल तर आता कठोर कारवाई करण्याच्या सूचना देखील त्यांनी पोलिसांना बजावल्या आहेत.