हिंगोली : जिल्ह्यातील क्वारंटाईन सेंटरमध्ये मध्यरात्री अडिचच्या सुमारास महिलेचा मृत्यू होतो. सोबत असलेल्या नातेवाईक शोकात किंचाळ्या फोडतात, मात्र तब्बल सहा तास डॉक्टर फिरकत नाही असा धक्कादायक प्रकार हिंगोलीतील लिंबाळा भागात घडली़ सेंटरमध्ये नियुक्त असलेल्या डॉक्टर आणि कर्मचा-यावर कारवाई करा अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विराट राष्ट्रीय लोकमंचच्यावतीने शेख नईम शेख लाल यांनी दिला आहे.
हिंगोली येथील आझम कॉलनीतील एका ३५ वर्षीय युवकाचा दोन दिवसापूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे त्यांचा परिवार लिंबाळा येथील क्वारंटाईन सेंटर मध्ये ठेवण्यात आला होता. यात आज पहाटे अडिचच्या सुमारास जैतुनबी भूरेखान या जवळपास ६४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. मात्र नातेवाईक शोक करीत क्वारंटाईन सेंटरच्या गेट पर्यत मदतीसाठी किंचाळत असतांना डॉक्टर तर सोडा वॉचमन देखील फिरकला नाही.
सकाळपर्यंत मदत मिळाली नाही असा आरोप नातेवाईक करीत आहेत. या प्रकरणी क्वारंटार्इंन सेंटरवर नियुक्त असलेल्या डॉक्टरांवर कारवाई करा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाव्दारे विराट लोकमंचचे संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल यांनी दिला आहे.
क्वारंटाईन सेंटरचा कारभार रामभरोसे
कोरोनाचा कहर जिल्ह्यात सुरु असतांना क्वारंटाईन सेंटर बाबत नागरीकांच्या मनात कमालीचे भय निर्माण होत आहे. कक्षातील रुग्ण दगावला तरी डॉक्टर फिरकत नाहीत, येथे कोणत्याच सुविधा मिळत नाहीत, साधी वाफे ची मशीन नाही आणि स्नानासाठी गरम पाणी मिळत नाही. भोजनाचा दर्जा देखील निकृष्ठ असल्याचा आरोप मयत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान क्वारंटाइन सेंटरवर डॉक्टरच थांबत नसतील हा कारभार रामभरोसे म्हणावे लागेल.
Read More दिग्गज बॉक्सर माईक टायसन पुन्हा एकदा बॉक्सिंग रिंगमध्ये पुनरागमन करणार