हिंगोली : येथील बेपत्ता झालेल्या एका तरूणाचे प्रेत कालव्यातील पाण्यात आढळुन आल्याने कळमनुरी तालुक्यातील दाती परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या तरूणाचा खुन प्रेमप्रकरणातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
राजु सुभाष पोटे (२२ रा.आखाडा बाळापूर) असे मृताचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार १५ मे रोजी राजु हा घरातुन बेपत्ता झाला होता. त्याने मोबाईल घरी ठेवला होता. तु एकटाच मला भेटायला ये, मोबाईल घरी ठेव, असा संदेश या मोबाईलवर आल्याचे कुटूंबीयांना निदर्शनास आल्यानंतर घरच्या लोकांना प्रेमप्रकरणाबाबत संशय आला. राजु रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने दुस-या दिवशी घरच्या लोकांनी त्याचा परिसरात व नातेवाईकांकडे शोध सुरू केला. आखाडा बाळापुर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार नोंदविली.
दरम्यान १७ मे रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास कळमनुरी तालुक्यातील दाती परिसरातील कालव्यातील पाण्यात एक मृतदेह काही गुराख्यांच्या निदर्शनास आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ सहायक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बालाजी पुंड, सपोनि शिवाजी बोंडले, जमादार बाबर शेख यांनी घटनास्थळी धाव घेत सदर प्रेत कालव्यातील पाण्यातुन वर काढुन, शवविच्छेदनासाठी आखाडा बाळापुर येथील ग्रामीण रूग्णालयात आणले.
या तरूणाच्या शरीरावर धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याचे व्रण दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे प्रेत राजु याचे असल्याची ओळख पटली आहे. तु एकटाच मला भेटायला ये, मोबाईल घरी ठेव, असा संदेश या मोबाईलवर आल्याचे त्याच्या कुटूंबीयांनी पोलिसांना सांगितल्यानंतर या तरूणाचा खुन प्रेमप्रकरणातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी आखाडा बाळापुर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.