Wednesday, September 27, 2023

कोरोनापेक्षा क्वारंटाईन सेंटरचीच भिती वाटते!

मकरंद बांगर हिंगोली : कोरोना जैविक संकटाच्या काळात सर्वपरिचित झालेला शब्द म्हणजे क्वारंटाईन. अर्थात विलगीकरण़ महानगरातून अथवा बाहेरगावाहून आलेल्या व्यक्ती मुळे कोरोनाचा संसर्ग वाढतो़ हा संसर्ग टाळण्यासाठी त्याला चौदा दिवस क्वारंटाईन केले जाते. परंतु संस्थात्मक क्वारंटाईन केंद्रातील अवस्था बघता कोरोना पेक्षाही क्वारंटाईमची सर्वांना भीती वाटायला लागली आहे.

हिंगोली शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. शहरातील वाढत असलेला हा संसर्ग रोखण्यासाठी कोरोनाबाधीतांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना क्वारंटाईन केले जात आहे. जिल्ह्यातून अपवादात्मक परिस्थितीतच बाहेर जाण्यासाठी ईपास दिली जात आहे. कोरोना बाधींताच्या संपर्कातील किंवा बाहेरगावाहुन आलेल्या व्यक्तीला होमक्वारटाईन किंवा संस्थात्मक क्वारंटाईन असे पर्याय असले तरी रेड झोन मधून येणा-या प्रत्येकाला संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

त्यासाठी ठिकठिकाणी असे केंद्र तयार करण्यात आले आहेत. सुरुवातीला या केंद्रामध्ये सुविधा दिसत होत्या़ मात्र जसजशी गर्दी वाढत गेली तसतसा सुविधांचा अभाव निर्माण होत आहे. क्वारटाईन सेंटरमध्ये क्वारंटाईन झालेल्या व्यक्तींना आलेला अनुभव तर अंगावर काटा आणणारा आहे. दोन दिवसापूर्वी मध्यरात्री अडीचच्या सुमारास एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. परंतु सकाळी दहा वाजेपर्यंत या ठिकाणी डॉक्टरचा सोडा साधा वॉचमेन देखील फिरकला नाही. आता या प्रकरणाची त्रिसदस्यीय समितीमार्फत चौकशी केली जात आहे. एकंदरीत या बाबतीत कुणाचेच कुणावर नियंत्रण नाही असे दिसत आहे.

हिंगोली नजीक लिंबाळा, कळमनुरी, वसमत, सेनगाव या चारही क्वारंटाईन सेंटर बद्दल तक्रारीचा सूर होता. प्रशासन एकीकडे क्वारंटाईन सेंटरमधील व्यक्तींसाठी सुविधा पुरविण्यात येत असल्याचे सांगते परंतु येथे अनुभव घेऊन आलेल्या व्यक्ती मात्र या केंद्रातील अस्वच्छता जाहीरपणे बोलताना दिसतात केंद्रातील शौचालय व निवास व्यवस्था सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून येते़ लिंबाळा येथील क्वारंटाईन सेंटर मध्ये तर साधी वाफेची मशीन देखील नाही.

या सेंटरमध्ये नियमित आरोग्य तपासणीची कायम बोंब आहे अनेक जण तर असो स्वच्छतेला वैतागून स्वत:च्या घरी निघून गेल्याचे ही अनेकांनी सांगितले़ कोरोना या भयानक संकटावर मात करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असले तरी स्थानिक प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे संस्थात्मक क्वारंटाईन सेंटर कोरोना प्रसाराचे केंद्र होणार नाही अशी भीती निर्माण झाली आहे. एकदाचा कोरोना झालेला परवडला परंतु संस्थात्मक क्वारंटाईन नको असे अनेक जण आता सांगत आहेत.

प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
क्वारंटाईन झालेल्या व्यक्तीनी केंद्रातील सुविधेबाबत वारंवार तक्रारी केल्या, प्रशासनाला याची माहिती दिल्याचे चर्चेत येते परंतु कुठेही तसूभर सुधारणा झाल्याचे दिसत नाही. अधिकारी व कर्मचारी तरी या केंद्राच्या आत मध्ये यायला घाबरतात. बाहेरच्या बाहेर निघून जातात क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेली व्यक्ती म्हणजे कोरोणा रुग्ण आहे की काय अशी भावना अधिकाºयांची दिसत आहे. त्यामुळेच १४ दिवस जीव मुठीत घेऊन येथे काढण्याचे दिव्य करावे लागत आहे.

Read More  रायगड जिल्हा हादरला : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या