22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeहिंगोलीमराठवाड्यातील बहुजनांचा आवाज काळाच्या पडद्याआड

मराठवाड्यातील बहुजनांचा आवाज काळाच्या पडद्याआड

एकमत ऑनलाईन

कळमनुरी : तालुक्याचे भूमिपुत्र राहुल गांधींचे निकटवर्तीय राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे फुफुसाच्या आजाराने उपचारादरम्यान पुणे येथील जहांगीर हॉस्पिटल येथे दि.१६ मे रोजी सकाळी निधन झाले.त्यांच्या निधनाची वार्ता कळताच हिंगोली जिल्ह्यावर शोककळा पसरली असुन मराठवाड्यातील बहुजनांचा आवाज काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना कार्यकर्त्यामधून व्यक्त होत आहे.

कळमनुरी तालुक्यातील भूमिपुत्र असलेले खासदार राजीव सातव यांचा जन्म पुणे येथे २१ सप्टेंबर १९७४ साली झाला ऐन तारुण्यात त्यांनी राजकारणात पदार्पण करीत २००२ साली मसोड पंचायत समिती गटातून पं. स. सदस्य म्हणून सामाजिक व राजकीय जिवनाला सुरुवात केली व आपल्या राजकीय वाटचालीचा श्री गणेशा केला. पण भाऊच्या व्यक्तिमत्त्वाची झेपच इतकी उत्तुंग होती की अल्पकालावधीत अवघा महाराष्ट्रभर त्यांनी लौकिक मिळवला. जनता जनार्दनाने व पक्षाने जी जी जबाबदारी साहेबावर सोपवली त्याला यथायोग्य न्याय देण्याच काम सातव यांनी नेहमी केलं. पंचायत समिती सदस्य तसेच २००७ साली जि .प. सभापती म्हणून राजीव सातव यांनी ग्रामीण भागात भरीव काम केले.

२००९ साली कळमनुरी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेल्यावर राहुल गांधींच्या विशेष मर्जीतील म्हणून राजीव सातव यांना मंत्रिपदाची संधी मिळाली असती मात्र स्वहितापेक्षा पक्षहित मोठे समजून त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक काम करण्याचे ठरवले, त्यामुळे पक्षाने त्यांना २०१० साली युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली त्या संधीचे सोने करून देशभर युवकांचे संघटन राजीव सातव यांनी वाढवले व देशभर अनेक उपक्रम राबवले.

यानंतर राजीव सातव यांची पक्षनिष्ठा ,मेहनत, व संघटनात्मक बांधणी खा.राहुल गांधींनी पाहिली व त्यांना २०१४ साली हिंगोली लोकसभेची उमेदवारी दिली. खा.राहुल गांधींचा व पक्षाचा विश्वास सार्थ ठरवत २०१४ साली मोदी लाटेतही भाऊंनी हिंगोली लोकसभेवर विजय मिळवून काँग्रेसचा तिरंगा डोलाने उभा केला. त्यावेळेस मोदी लाटेतही हिंगोली लोकसभेचे खासदार म्हणून २०१४ ते २०१९ पर्यंत विरोधी पक्षाचे खासदार म्हणून संसदेमध्ये प्रभावी व लक्षवेधी कामगिरी केली. विविध प्रश्नांची असलेली जाण, तिन्ही भाषेवर असलेले प्रभुत्व, विषयाची मुद्देसूद मांडणी, अभ्यासू विवेचन यातून साहेबांनी संसदेमध्ये आपली वेगळी छाप पाडली. जनसामान्यांचे प्रश्न पोटतिडकीने संसदेत मांडून जनसामान्याचा बुलंद आवाज दिल्लीपर्यंत पोहोचविला.

संसदेतील प्रश्नोत्तर तासातील अभ्यासू मांडणी, विधेयक मांडणे, संसदेतील उपस्थिती या सर्व बाबतीत ते नेहमी अग्रस्थानी राहिले, त्यामुळेच ते अनेकदा संसदरत्न पुरस्काराचे मानकरी ठरले. आपल्या पहिल्याच लोकसभा कार्यकाळात एवढेंदा संसदरत्न पुरस्कार घेणारे ते कदाचित एकमेव खासदार होते.या नंतर राज्यसभेचे खासदार, गुजरात काँग्रेसचे प्रभारी, काँग्रेस वर्किंग कमिटीची कायम निमंत्रित सदस्य, सरचिटणीस, काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते, कर्तव्यसंपन्न, प्रतिभावान, कल्पक युवा नेतृत्व, महाराष्ट्राचे भूषण ,संसदरत्न असा त्यांच्या राजकीय प्रवास झाला. राजीव सातव यांनी आपल्या कार्यकुशल नेतृत्वाने पक्षांमध्ये आपलं एक अढळ स्थान निर्माण केले. त्या दरम्यान पक्षाचे नेते खा.राहुल गांधी , पक्षाध्यक्षा सोनिया गांधी ,वरिष्ठ नेते यांना सातव यांच्या नेतृत्व गुणाची व संघटनात्मक बांधणीची चुणूक जाणवली. यामुळेच पक्षनेतृत्वाने त्यांना गुजरात राज्याचे काँग्रेस प्रभारी म्हणून निवड केली.

संपूर्ण देशात मोदीमय वातावरण असताना महाराष्ट्राच्या या युवा नेतृत्वाने ही जबाबदारी आपल्या कोवळ्या खांद्यावर घेतली. गुजरात मध्ये मोदी शहांच्या समोर राजीव सातव हे नाव नवखे होते. मात्र जनसामान्यांच्या प्रश्नाला हात घालून ,मेहनतीने, निष्ठेने, संघटनात्मक बांधणी करून राजीव सातव यांनी विधानसभा निवडणुकीत जोरदार प्रतिकार केला व काँग्रेस पक्षाला विजयाच्या समिप आणले. जरी पक्षाला बहुमत मिळवता आले नसले तरी २०१२ च्या तुलनेत २०१७ साली १६ जागा काँग्रेसने जास्तीच्या जिंकल्या. त्यावेळेस भाजप जिंकूनही काँग्रेसचा जोरदार प्रतिकाराची देशभर चर्चा झाली. राजीव सातव यांचे पुढचे राजकीय भविष्य उज्वल असताना त्यांच्या अकाली निधनाने मराठवाड्यातील बहुजनांचा आवाज काळाच्या पडद्याआड झाल्याची भावना कार्यकर्ता मधून व्यक्त होत आहे.

दरम्यान, खा.राजीव सातव यांच्या पार्थिवावर आज सकाळी १०:३० वाजता कळमनुरी शहरातील विकास नगर येथील त्यांच्या कोहिनुर निवासस्थाना जवळ असलेल्या त्यांच्या शेतात करण्यात येणार आहे दरम्यान राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त कळताच शहरातील बाजारपेठ बंद झाली होती संपूर्ण शहरात शुकशुकाट पसरलेला होता. दरम्यान अंत्यसंस्काराच्या ठिकाणी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर,उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, अतुल चोरमारे,जिल्हा पोलिस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे,तहसिलदार मयुर खेंगले, मुख्यधिकारी उमेश कौढीकर, पोलीस निरीक्षक रंजित भोईटे, काँग्रेसचे माजी आमदार डॉ.संतोष टारफे, जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे,तालुकाध्यक्ष धनंजय पाटील, नंदकिशोर तोष्णीवाल आदींनी पाहणी केली.

स्पुटनिक व्ही ची दुसरी खेप हैदराबादमध्ये दाखल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या