हिंगोली : तालुक्यातील गौळ बाजार येथे शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या तरुण शेतक-याच्या डोक्यात लाकडाने वार करून खून केल्याची घटना रविवार दि. २२ मे रोजी सकाळी उघडकीस आली आहे. देवानंद संतोष मुधोळ(२०) असे या शेतक-याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कळमनुरी तालुक्यातील गौळ बाजार येथील संतोष मुधोळ यांचे गावापासून काही अंतरावर १२ एकर शेत आहे. शेता जवळूनच कालवा गेला असल्यामुळे शेतातील पिकांना पाणी देता येते. संतोष मुधोळ यांचा मुलगा देवानंद हा मागील काही दिवसापासून शेतात रात्रीच्या वेळी पिकाला पाणी देण्यासाठी जात होता. नेहमीप्रमाणे देवानंद हा शनिवारी रात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतात गेला होता. रविवारी सकाळी तो घरी परतला नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला.
सकाळी ९.०० ते ९.३० वाजण्याच्या सुमारास मुधोळ यांच्या शेजारी शेत असलेले शेतकरी शेतात जात असताना देवानंद याचा मृतदेह बाजेवर आढळून आला. या प्रकाराची माहिती शेतक-यांनी तातडीने गावात कळविली. त्यानंतर देवानंदच्या कुटुंबियांनी शेतात धाव घेतली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर आमदार संतोष बांगर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख राम कदम, माजी सभापती फकीरराव मुंडे यांनी शेतात जाऊन पाहणी केली.
यावेळी शेतामध्ये बाजेवर देवानंद यांचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यात लाकडाने वार करून खून केल्याचे स्पष्ट झाले. डोक्यात वार करण्यासाठी वापरलेले लाकूड देखील बाजेच्या बाजूला आढळून आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधीक्षक यतिश देशमुख, कळमनुरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रोयलावार, उपनिरीक्षक सोनुळे, जमादार घ्यार यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. मयत देवानंद मुधोळ यांच्या पश्चात आई, वडील भाऊ व बहीण असा परिवार आहे. घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र श्वान पथकाने काही अंतरावर असलेल्या रस्त्यापर्यंत माग काढला.