मुंबई : प्रतिनिधी
पवई परिसरात शनिवारी रात्री उशिरा हिट अँड रनची घटना घडली आहे. पवईतील आयआयटी मार्केटजवळ जेव्हीएलआर मार्गावर एका भरधाव क्रेटा कारने रस्त्याच्या कडेने चालणा-या पादचा-यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की या अपघातात ३ जण जखमी झाले आहेत. यातील एका महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर आहे, अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा आयआयटी मार्केट परिसरातून एक पांढ-या रंगाची क्रेटा कार अत्यंत वेगाने जात होती. जेव्हीएलआर मार्गावर महात्मा फुले नगरजवळ चालकाचे आपल्या कारवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ही कार थेट रस्त्याच्या कडेने चालणा-या पादचा-यांमध्ये शिरली. ही धडक इतकी भीषण होती की, धडक बसलेले तिघेही पादचारी हवेत उडून काही अंतरावर फेकले गेले. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली.
एक महिला गंभीर, रुग्णालयात उपचार सुरू
या अपघातामध्ये एकूण तीन जण जखमी झाले आहेत. स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना आणि रुग्णवाहिका बोलावून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी एका महिलेच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. इतर दोन जखमींवरही उपचार सुरू आहे. त्यांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांची टीम अथक प्रयत्न करत आहे.
















