22.2 C
Latur
Monday, January 12, 2026
Homeमहाराष्ट्रमहायुतीकडून मतदानाआधीच घोडेबाजार

महायुतीकडून मतदानाआधीच घोडेबाजार

सत्तेचा गैरवापर करून लोकशाहीची हत्या काँग्रेस प्रदेशध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मुक्त आणि पारदर्शक निवडणुकीच्या धोरणाला हरताळ फासला आहे. पैशाचा खेळ व सत्तेचा बेफाम गैरवापर करून सत्ताधा-यांनी लोकशाही गुंडाळून ठेवली आहे. मतदानाआधीच घोडेबाजार सुरु झाला आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होत आहे. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वी अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ यांनी महायुतीवर जोरदार टीका केली.

निकोप लोकशाहीत विरोधी पक्षांनाही तेवढेच महत्व आहे. पण आता विरोधकच नको अशी प्रवृत्ती भाजप आणि महायुतीची बनली असून त्यातून बिनविरोधसाठी सत्ताधारी कोणत्याही स्तराला जात आहेत. विरोधी पक्षांच्या उमेदवाराला अर्ज भरू न देणे, धमक्या देणे, दबाव तंत्राचा वापर करणे असा पोलिस, प्रशासनाच्या मदतीने बेशरमपणाचा खेळ सुरु आहे. निवडणूक आयोग मात्र याचा मूक साक्षीदार बनला आहे, अशी खंत सपकाळ यांनी व्यक्त केली.

.. तर अजित पवारांनी बाहेर पडावे
महापालिका निवडणुकीत सत्तेतील तीन पक्ष एकमेकांच्या समोर उभे ठाकले असून तेच एकमेकांवर टीका करत आहेत. हा प्रकार म्हणजे ‘मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर’ असा आहे. त्यामुळे भाजपवर आरोप करणा-या अजित पवार यांनी सत्तेतून बाहेर पडावे नाहीतर भाजपने तरी अजित पवार यांनी बाहेरचा रस्ता दाखवावा असे सपकाळ म्हणाले.

राहुल नार्वेकरांवर कारवाई करा
संवैधानिक पदावरील व्यक्तीने राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवणे अपेक्षित आहे. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली आहे. हे महाशय महापालिकेच्या निवडणुकीत आपल्या नातेवाईकांसाठी अत्यंत खालच्या पातळीवर उतरले आहेत. विरोधकांना अर्ज भरू देण्यात अडथळा आणणे, विरोधकांना धमक्या देणे, पदाचा गैरवापर करणे अशा प्रकारचे वर्तन नार्वेकर यांनी केल्याने केल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीचा पुनरुच्चार हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR