सना : येमनमध्ये सौदी अरेबिया आणि हुथी बंडखोरांमध्ये संघर्ष सुरुच आहे. हुथी बंडखोरांनी येमनमधील मारिब प्रांतात सौदी अरेबियाचे एफ-१५ फायटर जेट पाडल्याचा दावा केला आहे. हुथी लष्करी प्रवक्त्यानुसार, सौदीकडून आक्रमक मोहिमा सुरु असताना या विमानाला लक्ष्य करण्यात आले. याव्यतिरिक्त, सौदीचे एक विंग लोंग २ सशस्त्र ड्रोन देखील पाडल्याचा दावा बंडखोरांनी केला आहे.
हुथींशी संबंधित अंसार अल्लाह गटाने मारिबमधील विमान कोसळल्याच्या ठिकाणचा व्हीडीओ समोर आणला आहे. या व्हीडीओमध्ये वाळवंटात विमानाचे जळालेले अवशेष, विमानाची शेपूट आणि अरबी खुणा स्पष्ट दिसत आहेत. तसेच तिथे हुथी सैनिक उभे आहेत. बंडखोरांच्या मते, सौदी विमानांनी खमीस मुशैत आणि ताईफ हवाई तळावरून उड्डाण करून तैज, लाहिज, हज्जा, मारिब आणि सादा प्रांतांवर गेल्या आठवड्यात ४५० हून अधिक हवाई हल्ले केले होते. या हल्ल्यांमध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. पाडलेल्या विमानाचा शोध घेण्यासाठी आलेल्या सौदीच्या इतर फायटर जेट्सनाही हुथी बंडखोरांनी हुसकावून लावले.
वाढता संघर्ष आणि मक्का वादाची पार्श्वभूमी
सौदी अरेबिया आणि हुथींमधील हा संघर्ष मध्य पूर्वेतील संघर्षाचा भाग बनत चालला आहे. हुथींनी सौदी अरेबियाच्या येन्बू तेल बंदर आणि खामिस मुशैत इथल्या हवाई तळावर ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ले केले. मंगळवारी सौदी अरेबियाने मक्केच्या दक्षिणी भागात एक हौथी ड्रोन पाडले होते. मात्र, हुथींनी मक्केला लक्ष्य केल्याचे आरोप फेटाळून लावला.
















