लातूर : नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात लातूर कनेक्शन पुन्हा एकदा समोर आले असून केंद्रीय अन्वेषण विभागाची (CBI) टीम पुन्हा लातूरमध्ये दाखल झाली आहे. या कारवाईदरम्यान सीबीआयने लातूरमधील एका निवृत्त प्राध्यापकाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित प्राध्यापकाची कसून चौकशी सुरू असून या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचे अधिकारी मागील काही दिवसांपासून विविध राज्यांमध्ये तपास मोहीम राबवत आहेत. त्याच अनुषंगाने लातूरमध्येही पुन्हा तपासाची चक्रे फिरू लागली आहेत. सीबीआयच्या पथकाने स्थानिक पातळीवर काही व्यक्तींशी संपर्क साधत माहिती गोळा करण्यास सुरुवात केली असून निवृत्त प्राध्यापकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
जुलै २०२४ मध्येही नीट पेपरफुटी प्रकरणामुळे लातूरचे नाव चर्चेत आले होते. त्या वेळी काही कोचिंग क्लासेस, परीक्षा व्यवस्थापनाशी संबंधित व्यक्ती आणि विद्यार्थ्यांच्या संपर्कातील लोकांची चौकशी करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा सीबीआयची टीम लातूरमध्ये दाखल झाल्याने या प्रकरणाचे धागेदोरे अधिक खोलवर जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, तपास यंत्रणा पेपरफुटीचे जाळे, प्रश्नपत्रिका लीक होण्याचे संभाव्य मार्ग आणि त्यामागील आर्थिक व्यवहार यांचा तपास करत आहे. काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे, मोबाईल डेटा आणि संपर्क तपशीलांचीही पडताळणी केली जात असल्याचे समजते. मात्र, सीबीआयकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान, या कारवाईमुळे लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून शैक्षणिक क्षेत्रातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नीटसारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना, तपासातून नेमके कोणते धागेदोरे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
















