मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता हृतिक रोशनने अलीकडेच शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांचा नवा चित्रपट ‘ओ रोमियो’ पाहिला असून, तो या चित्रपटाच्या प्रेमात पडला आहे. विशाल भारद्वाज यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाचे हृतिकने सोशल मीडियावर तोंडभरून कौतुक केले आहे.
हृतिकने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करत आपला अनुभव शेअर केला आहे. हृतिक लिहितो, ओ रोमियोची अनोखी धाटणी तुम्हाला खिळवून ठेवते. मला हा चित्रपट पाहताना खूप मजा आली. पुढे त्याने शाहिद कपूरचा उल्लेख करत म्हटले, शाहिद, तू अशा प्रकारच्या चित्रपटासाठी सर्वोत्तम आहेस. तू अप्रतिम काम केले आहेस. हृतिक रोशन स्वत: एक उत्तम अॅक्शन स्टार आहे, त्यामुळे त्याने चित्रपटातील अॅक्शन दृश्यांची विशेष दखल घेतली. सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट नक्की पाहा.
विशेषत: तो गोल धावण्याचा अॅक्शन सीन अत्यंत जबरदस्त होता असेही त्याने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. विशाल भारद्वाज यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ओ रोमियो हा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट १३ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात शाहिद कपूरसोबत तृप्ती डिमरी, नाना पाटेकर आणि अविनाश तिवारी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत असला, तरी प्रेक्षकांकडून आणि सिनेइंडस्ट्रीतून चित्रपटाचे कौतुक होत आहे. ओ रोमियोने पहिल्या सात दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर सुमारे ४७.१५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

