कानपूर : प्रशासकीय सेवेतील अधिकारी कशा पद्धतीने लोकांकडून पैसे उकळून संपत्ती जमवत आहेत, याची प्रचिती देणा-या घटना समोर येत आहेत. असेच एक प्रकरण उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात समोर आले आहे. एका पोलिस उपअधीक्षकाला उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती कमावल्याचा प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे. या अधिका-याचे नाव ऋषिकांत शुक्ला आणि आतापर्यंत केलेल्या तपासातून समोर आलेली संपत्ती आहे, १०० कोटी रुपये आणि ही संपत्ती जमवली फक्त दहा वर्षात! ही माहिती समोर आल्यानंतर उत्तर प्रदेशच्या पोलिस दलात खळबळ माजली.
गृह विभागाने हे प्रकरण दक्षता विभागाकडे चौकशीसाठी सोपवले असून, अधिका-यांनी सांगितले की अजूनही याचा तपास सुरूच असून या अधिका-याने २०० ते ३०० कोटी रुपये संपत्ती जमवली असण्याचा अंदाज आहे. सध्या निलंबित करण्यात आलेल्या पोलिस उपअधीक्षक ऋषिकांत शुक्लांना सेवेतून कायमचे बडतर्फ करण्याची करण्यात आली आहे.
उपनिरीक्षक ते उपअधीक्षक
कानपूरच्या पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ऋषिकांत शुक्लांवर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती. त्यातून त्यांनी भ्रष्टाचारातून जमवलेल्या संपत्तीची माहिती समोर आली. ऋषिकांत शुक्ला हे १९९८ ते २००९ या काळात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. विशेषत: कानपूरमध्ये ते सेवेत राहिले. याच काळात त्यांनी भ्रष्टाचाराच्या मार्गाने संपत्ती जमवली. एसआयटीने केलेल्या चौकशीतून समोर आले की, शुक्ला यांनी घोषित उत्पन्नाच्या कितीतरी पट जास्त संपत्ती जमवली. ही संपत्ती त्यांच्या, कुटुंबातील सदस्य, जवळचे लोक आणि भागीदारांच्या नावे आहे.
२०० ते ३०० कोटी अवैध संपत्ती
पैशांचा भस्म्या झालेल्या या ऋषिकांत शुक्ला यांनी २०० ते ३०० कोटी रुपयांची संपत्ती जमवली असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. ज्या व्यक्तीने ऋषिकांत शुक्लाच्या भ्रष्टाचाराची तक्रार दिली होती, ते सौरभ भदौरिया म्हणाले, शुक्ला एसओजीमध्ये कार्यरत होते, तेव्हा ठेकेदारी, जमीन बळकावणे आणि इमारती उभारण्याच्या नावाखाली प्रचंड भ्रष्टाचार केला. आतापर्यंतच्या तपासात भलेही १०० कोटी रुपयांची संपत्ती समोर आली असेल, पण त्यांची एकूण संपत्ती २०० ते ३०० कोटी रुपये आहे.

