अंतरवाली : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. २९ ऑगस्टपासून मूळ गाव असलेल्या अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी प्रसाद लाड यांनी जरांगे यांच्या मागण्या केल्याचे जाहीरपणे सांगितले. पण असे असूनही मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. किमान चार प्रमाणपत्र दिल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
हैदराबाद गॅझेट प्रमाणपत्राचे वाटप सुरू होऊ द्या मग बघू, असे ते स्पष्टपणे म्हणाले. इतकेच काय तर हैदराबाद गॅझेट प्रमाणपत्राचे वाटप मराठवाड्यातून सुरू व्हावे, असेही मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले. पाणी पितो पण उपोषण सोडणार नाही, यावर मनोज जरांगे पाटील ठाम राहिले. सर्व मागण्या मान्य केल्याशिवाय उपोषण थांबणार नाही असे त्यांनी सर्वांसमोर जाहीर केले.
भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांना पाणी पिण्याची विनंती केली. तेव्हा मनोज जरांगे म्हणाले की, तुमच्या शब्दाचा मान राखतो, पण उपोषण सोडणार नाही. दोन दिवस सलाईन लावणार आणि पाणी पिणार, पण उपोषण सोडणार नाही, असेही ते पुढे म्हणाले. सातारा कोल्हापूर गॅझेटसाठी मनोज जरांगे यांनी दोन दिवसांची मुदत दिली आहे. दुसरीकडे, मुंबईत आंदोलन करणार या भूमिकेवरही जरांगे ठाम आहेत. त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांच्या नजरा लागून आहे.
मनोज जरांगे यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यासमोर सांगितले की, मराठा आरक्षण श्रेयवादात अडकले आहे, श्रेय शिंदेंनी घ्यायचे की फडणवीसांनी यावरून लढाई सुरू आहे. इतकंच काय तर मनोज जरांगे यांनी मध्यस्थी करणा-या विखे पाटलांचे नाव घेऊन टीकास्त्र सोडले. विखे पाटलांवर विश्वास ठेवला, पण ते आमची शाळा करत आहे, टीकाही मनोज जरांगे यांनी केली. विखे पाटील चर्चेसाठी का येत नाहीत, असा प्रश्नही मनोज जरांगे यांनी विचारला. विखे पाटलांकडून शिंदे आणि फडणवीस यांच्यात भांडण लावण्याचे काम सुरू आहे, असेही ते म्हणाले. १२ तारखेपर्यंत सरकार काय करतेय ते बघू, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
















