Homeमहाराष्ट्र'भोंदू बाबा अशोक खरातला वाचवण्यासाठी निदाला गोवलं'; टीसीएस धर्मांतर प्रकरणात वडिलांचा खळबळजनक आरोप

‘भोंदू बाबा अशोक खरातला वाचवण्यासाठी निदाला गोवलं’; टीसीएस धर्मांतर प्रकरणात वडिलांचा खळबळजनक आरोप

नाशिक: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या नाशिकमधील बीपीओ केंद्रात गाजलेल्या कथित धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणात आता एक नवीन वळण आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेली निदा खान हिच्या वडिलांनी सर्व आरोप फेटाळून लावत पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात याच्यावरील बलात्काराचे प्रकरण दाबण्यासाठी आणि लोकांचे लक्ष भरकटवण्यासाठी माझ्या मुलीला या प्रकरणात गोवण्यात आले आहे,” असा खळबळजनक दावा तिच्या वडिलांनी केला आहे.

निदाच्या वडिलांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की, हे संपूर्ण प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित असून एका मोठ्या षडयंत्राचा भाग आहे. नाशिकचा स्वयंघोषित धर्मगुरू अशोक खरात याच्यावर बलात्काराचे गंभीर आरोप आहेत. हे प्रकरण सध्या चर्चेत असताना, त्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी निदा खान आणि टीसीएस प्रकरणाचा बभ्रा केला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. निदाने कधीही कोणाला धर्मांतरासाठी प्रवृत्त केले नाही किंवा कोणत्याही देवदेवतांबद्दल आक्षेपार्ह विधान केले नाही. उलट ती सध्या गर्भवती असून या तणावामुळे तिची प्रकृती खालावली आहे, असेही तिच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केले.

काय आहे टीसीएस धर्मांतर प्रकरण?
नाशिकच्या टीसीएस बीपीओ युनिटमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी गंभीर आरोप केले होते. यामध्ये प्रामुख्याने धर्मांतरासाठी दबाव: हिंदू महिला कर्मचाऱ्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करणे, हिंदू देवदेवतांचा अपमान करणे आणि मांसाहार करण्यासाठी सक्ती करणे, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ करणे आणि तक्रार केल्यास कामावरून काढून टाकण्याची धमकी देणे.

या प्रकरणी नाशिक पोलिसांनी आतापर्यंत ९ गुन्हे दाखल केले असून ७ जणांना अटक केली आहे. निदा खान ही या प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचे बोलले जात असून ती सध्या फरार आहे. तिने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. नाशिक पोलिसांनी निदा खानच्या पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, निदाचे वकील ॲड. बाबा सय्यद यांनी सांगितले की, निदा गर्भवती असल्याने आणि तिच्यावरील आरोप निराधार असल्याने लवकरच न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला जाईल. या दाव्यांमुळे आता नाशिक पोलीस आणि प्रशासन या प्रकरणाचा तपास कसा पुढे नेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR