23.6 C
Latur
Monday, July 14, 2025
Homeमहाराष्ट्रमी ना महायुतीचा, ना महाआघाडीचा

मी ना महायुतीचा, ना महाआघाडीचा

अमरावती : लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. प्रत्येक पक्षाने तशी तयारीही सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये जागावाटपावर चर्चा सुरू आहे. अशातच प्रहार जनशक्­ती पक्षाने अमरावती मतदारसंघावर दावा ठोकला आहे. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अमरावती मतदारसंघावर आमचाच दावा असल्याचे म्हटले आहे. आम्ही सध्या कुणाच्याही बाजूने नाही, असेही त्यांनी सांगितले आहे. त्याशिवाय अमरावतीची जागा प्रहारला मिळाली पाहिजे, नाहीतर नवनीत राणा यांनी प्रहारच्या तिकिटावर अमरावती लोकसभा निवडणूक लढवावी, असेही म्हटले आहे.

आम्ही सध्या कोणाच्याही (महायुती, महाविकास आघाडी) बाजूने नाही. काही मुद्दे आणि पक्षाच्या धोरणाप्रमाणे आम्ही आपली राजकीय भूमिका निश्चित करणार आहोत. मी कुणाच्या बाजूने हे कोडं आहे आणि ते व्यवस्थितपणे सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. प्रहारची राजकीय मजबुती जिथे होईल तिकडे आम्ही जाऊ, असे बच्चू कडू म्हणाले. हो मी राजकीय मोलभाव ( बार्गेनिंग ) करतो आहे आणि ते आम्ही व्यवस्थित करू. लोकसभेऐवजी आम्हाला विधानसभेत जास्त जागा हव्या आहेत, असेही बच्चू कडू म्हणाले.

नवनीत राणांनाही ऑफर
बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकला आहे. त्याशिवाय नवनीत राणा यांनाही ऑफर दिली आहे. ते म्हणाले की, अमरावतीमध्ये प्रहार पक्षाचे दोन आमदार आहेत. इतर पक्षाचे तेवढे नाहीत. म्हणून अमरावती लोकसभेची जागा प्रहारला मिळाली पाहिजे. एकतर अमरावतीची जागा प्रहारला मिळावी. नाहीतर नवनीत राणांनी प्रहारच्या तिकिटावर अमरावती लोकसभा निवडणूक लढवावी. त्यांच्याशी अजून कुठलीही चर्चा झालेली नाही.

बच्चू कडूंना पत्रकार परिषदेचे आमंत्रण नाही
महायुतीच्या आजच्या एकत्रित प्रेस कॉन्फरन्स संदर्भात मला माहिती नाही. आजच्या महायुतीच्या प्रेस कॉन्फरन्सबद्दल मला निरोप नाही, निमंत्रणही नाही म्हणून मी तिथे उपस्थित नाही, असे बच्चू कडू म्हणाले. कदाचित महायुतीतील पक्षांना मला विश्वासात घ्यावे असे वाटले नसावे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR