नवी दिल्ली : काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी बुधवारी वीर सावरकर पुरस्काराबाबत स्पष्टीकरण जारी केले. ते म्हणाले की त्यांना या पुरस्काराबद्दल केरळमध्ये असताना माध्यमांतील वृत्तांमधूनच माहिती मिळाली.
थरूर यांनी स्पष्ट केले की आयोजकांनी त्यांना न विचारताच त्यांचे नाव घोषित केले आहे. ते या पुरस्काराबद्दल अनभिज्ञ होते आणि त्यांनी तो स्वीकारलाही नाही. ते म्हणाले की अशा परिस्थितीत दिल्लीत होणा-या कार्यक्रमात सहभागी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. दरम्यान, एनजीओ दि हिंगरेज रूरल डेव्हलपमेंट सोसायटी इंडियाचे संस्थापक अजी कृष्णन यांनी दावा केला की, ते एक महिन्यापूर्वी थरूर यांच्या घरी भेटले होते आणि त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यास सहमती दर्शवली होती.
दोन आठवड्यांपूर्वीही ज्युरीचे अध्यक्ष रवीकांत यांनी त्यांची भेट घेतली होती. खरे तर, बुधवारी दिल्लीत ‘वीर सावरकर इंटरनॅशनल इम्पॅक्ट अवॉर्ड २०२५’ आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले असून जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा देखील उपस्थित होते.

