नवी दिल्ली : दहशतवादाला खतपाणी घालणा-या आणि मानवतेच्या शत्रूंपर्यंत सिंधू नदीचे पाणी आम्ही कोणत्याही परिस्थितीत पोहोचू देणार नाही. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, अशा कडक शब्दांत भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. तेलंगणा भाजपच्या वतीने हैदराबाद येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. पहलगाम येथील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऐतिहासिक पाऊल उचलत सिंधू जल करार स्थगित केला आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानसह देशातील विरोधकांवरही जोरदार निशाणा साधला.
भारतीय लष्कराने केलेल्या ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत संरक्षणमंत्री म्हणाले, जे लोक शांतता आणि सलोख्याची भाषा समजत नाहीत, त्यांना त्यांच्याच भाषेत कसे उत्तर द्यायचे, हे भारताला चांगलेच ठाऊक आहे. हे आम्ही ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. भारतावर जर दहशतवादी हल्ले झाले, तर पाकिस्तानचा अन्न आणि पाण्याचा पुरवठा रोखला जाईल, हे आमच्या सरकारने आधीच स्पष्ट केले होते असे ते म्हणाले.
सिंधू जल करार स्थगित
गेल्या वर्षी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार आपल्या अधिकारांचा वापर करत सिंधू जल करार तात्पुरता स्थगित केला आहे. जोपर्यंत पाकिस्तान सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणे पूर्णपणे आणि कायमचे बंद करत नाही, तोपर्यंत हा करार स्थगितच राहील, असे भारताने ठणकावून सांगितले.
भारताकडे लस आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्रही
आजचा भारत हा जगासाठी एक विश्वासार्ह भागीदार म्हणून पुढे आला असून संकटाच्या काळात नेहमीच इतर देशांच्या मदतीला धावून जातो, असे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. कोरोनाच्या काळात भारताने अनेक देशांना केलेल्या मदतीचा उल्लेख करत ते म्हणाले की, आज जगामध्ये भारताची प्रतिमा जगाचा मित्र अशी झाली आहे. मात्र, शत्रूंना इशारा देताना ते म्हणाले की, भारताच्या शत्रूंनी हे अजिबात विसरू नये की, संकटकाळात जगाला वाचवण्यासाठी भारताकडे जशी लस आहे, तशीच शत्रूचा थरकाप उडवण्यासाठी ब्रम्होस क्षेपणास्त्रही सज्ज आहे.
















