नवी दिल्ली : सिंधू जल करारावरून पुन्हा एकदा पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतावर नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तानने सिंधू जल करारासाठी कितीही संघर्ष केला तरी, त्याला पाण्याचा एक थेंबही मिळणार नाही असे भारताने स्पष्ट केले आहे. सिंधू जल करार अजूनही भारताने थांबवला आहे. येत्या काळात पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानपर्यंत पोहोचणार नाही याची खात्री भारताने दिला आहे.
केंद्रीय जलविद्युत मंत्री सी. आर. पाटील यांनी ही माहिती दिली. पाटील म्हणाले की, भारताकडे पाणी वळवण्याच्या योजनेवर गृहमंत्री अमित शाह स्वत: देखरेख करत आहेत. १९६० पासून अस्तित्वात असलेला सिंधू जल करार आता पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. हा करार सध्या स्थगित आहे. पंतप्रधान मोदींनी हा ऐतिहासिक निर्णय घेतल्यापासून, सिंधू नदीचा एक थेंबही पाकिस्तानला जाणार नाही, यासाठी आमचे सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. गृहमंत्री अमित शाह स्वत: या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत असेही पाटील म्हणाले. मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकतो की आमचे काम नियोजित वेळेनुसार पुढे जात आहे आणि येत्या काही वर्षांत पाकिस्तानला भारताकडून पाण्याचा एक थेंबही मिळणार नाही, असेही ते म्हणाले.
भारताने करार स्थगित केला
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने गेल्या वर्षी सिंधू जल करार स्थगित केला होता. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाहीत, हे भारताने स्पष्ट केले होते. तेव्हापासून पाकिस्तानने वारंवार आपली नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तानने जागतिक व्यासपीठांवरही हा मुद्दा उपस्थित केला आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देत राहील, तोपर्यंत हा करार स्थगित राहील असे भारताने स्पष्ट केले आहे.
















