27 C
Latur
Friday, March 6, 2026
Homeअंतरराष्ट्रीयमी नसतो तर भारत-पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध पेटले असते

मी नसतो तर भारत-पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध पेटले असते

डोनाल्ड ट्रम्प यांचा विमानांबाबत नवा दावा

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील वादावर खळबळजनक दावा केला आहे. मे २०२५ मध्ये दोन्ही देशांमधील तणाव टोकाला गेला असताना, आपण केवळ व्यापारावरील टॅरिफची धमकी देऊन संभाव्य अणुयुद्ध थांबवले, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे, या संघर्षात दोन्ही बाजूंची तब्बल १० विमाने पाडली गेली होती, असा नवा आकडाही त्यांनी आता मांडला आहे.

एका मुलाखतीत ट्रम्प यांनी आपल्या परराष्ट्र धोरणाचे गुणगान गायले. मी माझ्या दुस-या कार्यकाळात आतापर्यंत आठ युद्धे सोडवली आहेत. त्यापैकी सहा तर केवळ टॅरिफच्या जोरावर मिटवली. मी स्पष्ट सांगितले होते की, जर तुम्ही युद्ध थांबवले नाही, तर मी तुमच्यावर इतका टॅरिफ लादेन की तुम्हाला ते परवडणार नाही. मला निष्पाप लोकांचा बळी गेलेला पाहायचा नव्हता असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. भारत-पाकिस्तान युद्धाबाबत बोलताना ट्रम्प यांनी विमानांच्या पडझडीचा आकडा पुन्हा बदलला आहे. सुरुवातीला त्यांनी ५ विमाने पाडल्याचा दावा केला होता, जो नंतर ७ आणि ८ वर पोहोचला. आता हा आकडा त्यांनी १० विमानांवर नेला आहे. दोन्ही देश एकमेकांवर तुटून पडले होते, १० विमाने पाडली गेली होती. जर मी हस्तक्षेप केला नसता, तर हे जगातील भीषण अणुयुद्ध ठरले असते असे ट्रम्प म्हणाले.

१ कोटी लोकांचे प्राण वाचवले
पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी स्वत: त्यांचे आभार मानले होते. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी मला सांगितले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प तुम्ही किमान १ कोटी लोकांचे प्राण वाचवले आहेत असा दावाही त्यांनी या मुलाखतीत केला. केवळ भारत-पाकिस्तानच नाही, तर अझरबैजान आणि आर्मेनिया यांच्यातील ३२ वर्षांचा जुना वादही आपण अवघ्या दीड दिवसात मिटवल्याचे त्यांनी सांगितले.

भारताने फेटाळले दावे
भारताने ट्रम्प यांचा हा दावा नेहमीप्रमाणे पूर्णपणे फेटाळून लावला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यासाठी कोणत्याही तिस-या पक्षाची भूमिका नव्हती. दोन्ही देशांमधील सैन्य हालचाली आणि युद्धविराम हा द्विपक्षीय पातळीवर डीजीएमओच्या चर्चेतून साध्य झाला होता. काश्मीरसह सर्व मुद्दे हे द्विपक्षीय असून त्यात अमेरिकेच्या हस्तक्षेपाची गरज नसल्याची भारताची भूमिका ठाम आहे असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR