28.6 C
Latur
Thursday, May 15, 2025
Homeमहाराष्ट्रसंजय राठोडांनी लोकसभा घेतली तर मी त्यांची विधानसभा घेणार

संजय राठोडांनी लोकसभा घेतली तर मी त्यांची विधानसभा घेणार

यवतमाळमध्ये भावना गवळींचे जाहीर वक्तव्य

यवतमाळ : एकीकडे राज्यभरात महायुतीचे मेळावे होत असताना दुसरीकडे त्यामधील घटकपक्षांतील नाराजीही समोर येत आहे. यवतमाळमधल्या महायुतीच्या मेळाव्यात शिंदे गटामधल्या दोन नेत्यांमध्येच वर्चस्ववादाची लढाई जुंपल्याचे दिसून आले. ‘मै मेरी झाशी नहीं दुंगी’ असे म्हणत भावना गवळींनी पुन्हा एकदा यवतमाळ-वाशिम लोकसभा लढण्याचे संकेत दिले आहेत.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी संजय राठोड यांच्या नावाची चर्चा आहे. त्याचाही भावना गवळींनी भाषणात उल्लेख केला. संजय राठोड यांनी लोकसभा घेतली तर त्यांची विधानसभा मी घेणार असे भावना गवळी म्हणाल्या.

दोन दिवसांपूर्वीही भावना गवळी यांनी लोकसभेच्या निवडणुकीवरून भाष्य केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा निर्णय हा वरिष्ठ घेणार आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मीच प्रबळ दावेदार आहे. सातत्याने पाचवेळा युतीमधून निवडून आले असून या वेळीदेखील मीच उमेदवार असणार. प्रत्येक पक्षाला वाटते की आपल्या पक्षाचा आपला उमेदवार असावा, त्यात काही वावगे नाही.

याआधीही भावना गवळींनी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून जाहीर वक्तव्य केले होते. यवतमाळ- वाशिम मतदारसंघात मीच निवडणूक लढवणार असल्याचे सांगत जर महायुतीने दुसरा उमेदवार दिला तर त्याला विरोध करण्याचे संकेत दिले होते. महायुतीच्या वतीने या ठिकाणी दुसरा उमेदवार देण्यात येणार असून त्यामुळे भावना गवळी यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा आहे.

यवतमाळ-वाशिम शिवसेनेचा बालेकिल्ला
शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. पण यावेळची परिस्थिती काहीशी वेगळी आहे. यावेळी शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे. शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांनी शिंदे यांना साथ दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी उमेदवार देण्याची तयारी ठाकरे गटाकडून सुरू आहे अशी चर्चा सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR