Homeमहाराष्ट्रशक्ती कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करा

शक्ती कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करा

कायद्यात गुन्हेगाराला २१ दिवसांत फाशीची तरतूद खा. वर्षा गायकवाड यांची मागणी

मुंबई : काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी राज्यातील महिला व मुलींवरील वाढत्या अत्याचारांप्रकरणी राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांना पत्र लिहून राज्यात शक्ती कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्राची ओळख प्रगत आणि सुरक्षित राज्य अशी होती. राज्यात पुण्यातील नसरापूर बलात्कार व हत्या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली आहे. त्यातच पुण्यात आणखी एका ९ वर्षीय मुलीवर तिच्याच नातेवाइकाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्यामुळे या संतापात अधिकच भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांना पत्र लिहून उपरोक्त मागणी केली आहे.

खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या, महाराष्ट्राची ओळख प्रगत आणि सुरक्षित राज्य अशी होती, पण आज परिस्थिती भीषण आहे. राज्यात महिला आणि चिमुकल्या मुलींवर होणारे अत्याचार पाहून महाराष्ट्राच्या लौकिकाला काळिमा फासला जात आहे. याच गंभीर विषयावर आज मी राज्याचे राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांना पत्र लिहिले आहे. महायुती सरकार लाडकी बहीण म्हणत केवळ इव्हेंटबाजी करत आहे.पण बहीण फक्त कागदावर लाडकी असून चालत नाही, तर ती रस्त्यावर, शाळेत आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षित असणे महत्त्वाचे आहे. सरकारने आता पोकळ घोषणा थांबवून गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होईल प्रत्यक्ष कृती करावी, यासाठी राज्यपालांकडे पत्र लिहून लक्ष देण्याची मागणी केली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

भगिनींना न्याय हवा
महाविकास आघाडी सरकारने गुन्हेगारांना २१ दिवसांत फाशीची शिक्षा देणारा कठोर शक्ती कायदा’ मंजूर केला. मात्र, दुर्दैवाने मागील ३ वर्षांपासून हा कायदा केंद्र सरकारकडे धूळ खात पडला आहे. भगिनींना न्याय हवा असेल, तर हा कायदा त्वरित लागू होणे गरजेचे आहे. राज्यपालांनी यासाठी केंद्र सरकारकडे तातडीने पाठपुरावा करावा, यात हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे.

महिलांवरील गुन्ह्यांमध्ये १२.८% वाढ
ज्या मुंबईला आपण सुरक्षित मानतो, तिथेच महिलांवरील गुन्ह्यांमध्ये १२.८% वाढ झाली आहे. बलात्कार, विनयभंग आणि पॉक्सोच्या घटनांची वाढती संख्या ही राज्यासाठी शरमेची बाब आहे. राज्यातील वाढत्या घटना पाहता महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री हवा आहे. सध्याच्या मुख्यमंत्र्यांकडे अनेक खात्यांचा अवाढव्य भार आहे, ज्यामुळे गृहविभागाकडे साफ दुर्लक्ष होत आहे. राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला आज एका सक्षम गृहमंर्त्याची गरज आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR