मुंबई (प्रतिनिधी) : कुणबी प्रमाणपत्रे न मिळाल्यास २० जानेवारील मुंबईकडे आंदोलनासाठी निघण्याच्या निर्णयावर मनोज जरांगे ठाम असून आंदोलनाचे लोण मुंबईत येऊ नये यासाठी सरकारी पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या याद्या प्रसिद्ध करून तात्काळ कुणबी प्रमाणपत्रं देण्याचे आदेश महसूल विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी जिल्हाधिका-यांना दिले आहेत.
मराठा आरक्षणासाठी २६ जानेवारीपासून मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे. त्यासाठी ते स्वत: व राज्यभरातील आंदोलक २० तारखेला मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. हे आंदोलन काही काळ पुढे ढकलावे यासाठी सरकारकडून सतत प्रयत्न सुरू असले तरी जरांगे मात्र आंदोलनाबाबत ठाम आहेत. तुम्हाला मी मुंबईत येऊ नये, असे वाटत असेल तर न्या. शिंदे समितीला आतापर्यंत ज्या ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यांना तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर आज महसूल विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी जिल्हाधिका-यांना आदेश दिले आहेत तसेच कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्याचे आदेशदेखील त्यांनी दिले आहेत.