नवी दिल्ली : विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली होती. स्थापनेनंतर आघाडीच्या काही बैठकीय पार पडल्या मात्र, ५ राज्याच्या विधानसभा निवडणुकीमुळे आघाडीमध्ये काम होत नसल्याची टीका होत होती. आता वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इंडिया आघाडीची पुढील महत्वाची बैठक डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, या बैठकीपूर्वी समन्वय समितीच्या सदस्यांची चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे.
जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सलग तीन बैठका होऊनही इंडिया आघाडीची बैठक पुन्हा होऊ शकली नाही. या तीन महिन्यांत आघाडीतील परस्पर मित्रपक्षांमध्ये अनेक प्रकारचे राजकीय मतभेदही घडले. मित्रपक्षांच्या नेत्यांनीही काँग्रेसवर आरोप केले. मात्र ३ डिसेंबरला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर डिसेंबर महिन्यातच इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक होणार असल्याचे आघाडीशी संबंधित नेत्यांचे म्हणणे आहे. सध्या या बैठकीसाठी कोणत्याही शहराची निवड करण्यात आलेली नाही. देशाच्या कोणत्याही राज्याच्या राजधानीत किंवा मोठ्या शहरात या आघाडीचे संमेलनाचे आयोजन केले जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.