छत्रपती संभाजीनगर : आगामी विधानसभा निवडणूकीसाठी एमआयएम पक्षप्रमुख खा. असदोद्दीन ओवेसी यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत राज्यातील पाच उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यासह विद्यमान दोन आमदारांचाही समावेश आहे. महाविकास आघाडीसोबत युती करण्यासंदर्भातील चेंडू पुन्हा एकदा ओवेसी यांनी आघाडीच्या कोर्टात टोलावला.
विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. एमआयएम पक्षाने महाविकास आघाडीत आम्हाला घ्या, अशी खुली ऑफर महाविकास आघाडीला दिली होती. ८ सप्टेंबरपर्यंत निर्णय न घेतल्यास आम्ही स्वबळावर निवडणूक लढणार अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष जलील यांनी मागील आठवड्यातच केली होती. सोमवारी पक्षाचे प्रमुख असदोद्दीन ओवेसी शहरात दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत हज हाऊस येथे वक्फ बिलाच्या विरोधात परिषद घेण्यात आली.