पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२३ परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात महेश घाटुळे याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या परीक्षेत प्रीतम सानप याने दुसरा, तर शुभम पवार याने तिसरा क्रमांक पटकावला आहे. तर वैष्णवी बावस्कर हिने मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. आता उमेदवारांना आपल्या पदांचे पसंतीक्रम द्यावे लागणार आहेत. या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची आहे. अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगानं अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे / कागदपत्रे पडताळणी करताना काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये बदल होऊ शकतो आणि पर्यायाने उमेदवाराचा गुणवत्ता क्रम बदलू शकतो आणि उमेदवार अपात्र ठरू शकतो असे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.
ही सर्वसाधारण गुणवत्ता यादी विविध न्यायालयात किंवा न्यायधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणांवरील अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आली आहे. वैद्यकीय अहवाल विचारात घेऊन उमेदवारांना पदांचे पसंतीक्रम ऑनलाईन स्वरुपात सादर करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.