21.6 C
Latur
Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात भाजप बटेंगे तो कटेंगेमुळे बॅकफूटवर!

राज्यात भाजप बटेंगे तो कटेंगेमुळे बॅकफूटवर!

मुंबई : प्रतिनिधी
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलिकडेच बटेंगे तो कटेंगे असा नारा दिला होता. आजकाल ही घोषणा देशभर चर्चेचा विषय बनली आहे. योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेला महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील एनडीएमध्ये विरोध होताना दिसत आहे. या घोषणेवर महायुतीच्या नेत्यांनीच आक्षेप नोंदविला. यामध्ये आक्षेप नोंदविण्यात अजित पवार यांच्यासह अशोक चव्हाण, भाजप नेत्या पंकजा मुंडे, तसेच उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांसारख्या बड्या नेत्यांचा समावेश आहे.

या घोषणेमुळेच राज्यात भाजप बॅकफूटवर गेल्याची चर्चा आहे. लोकसभेला चारसौ पारचा नारा दिला होता. त्यावेळी विरोधकांनी त्याच मुद्यावर भाजपला लक्ष्य केले होते. आता बटेंगे ते कटेंगे या मुद्यावरून सत्ताधा-यांना लक्ष्य केले जात आहे.

राज्य विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रचारासाठी राज्यात आले, तेव्हा पहिल्याच सभेत बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा दिली. या घोषणेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बळ दिले. त्यानंतरही योगी आदित्यनाथ सातत्याने हाच मुद्दा मांडत होते. त्यावरून महायुतीविरोधात विरोधकांनी चांगलेच रान पेटविले आणि भाजपला चांगलेच कात्रीत पकडले. हा मुद्दा अंगलट येतोय, हे लक्षात येताच भाजप नेत्यांनी यावर स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली.

विशेष म्हणजे या घोषणेला खुद्द भाजप नेते आणि महायुतीतील मित्र पक्षाच्या नेत्यांनी विरोध केला. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आघाडीवर होते. तसेच खासदार अशोक चव्हाण यांनीही या घोषणेला विरोध केला. तसेच माजी मंत्री पंकजा मुंडे यांनीही अप्रत्यक्ष विरोध केला. त्यामुळे या घोषणेवरून राज्यात चांगलेच वातावरण तापले.

दरम्यान या घोषणेला विरोध होताच गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात महायुतीच्या सभांमध्ये याचा पुनरुच्चार टाळला जात आहे. लोकसभा निवडणुकीत चार सौ पारचा नारा दिल्याने भाजप अडचणीत आला होता. याचाच धसका घेत आता नारा देणे बंद करत भाजप बॅकफूटवर गेल्याचे दिसून आले.

सध्या महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका सुरू आहेत. तसेच उत्तर प्रदेशात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या प्रचारात भाजपने बटेंगे तो कटेंगे हेच घोषवाक्य सुरू ठेवले. विशेषत: योगी आदित्यनाथ यांनी या मुद्याला बळ दिले. परंतु पुरोगामी महाराष्ट्रात या मुद्याला विरोध झाल्याने भाजपला ही घोषणा थांबवावी लागली. दरम्यान, या घोषणेमुळे राज्यात ब-याच समाजघटकांत नाराजी पसरली असून, याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आता एक रहेंगे तो सेफ रहेंगेचा नारा
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी भोसरी येथे झालेल्या जाहीर सभेत ‘एक रहेंगे तो सेफ रहेंगे’चा नारा दिला. ‘बटे थे तब कटे थे, अब बटेंगे नही. एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ या भावनेतून आपल्याला कार्य करायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवीन भारत निर्माण झाला असून, ‘सबका साथ, सबका विकास’ सुरू आहे. कोणामध्ये भेदभाव नसल्याचे सांगत त्यांनी एकीकरणाचे आवाहन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR