28 C
Latur
Monday, November 11, 2024
Homeमहाराष्ट्रपैशाचा गैरवापर रोखण्यासाठी प्राप्तीकरची नजर

पैशाचा गैरवापर रोखण्यासाठी प्राप्तीकरची नजर

पुणे : प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. निवडणुकीच्या काळात अनेक उमेदवारांकडून पैशाचा गैरवापर होत असल्याचे प्रकार उघडकीस येतात. या पार्श्वभूमीवर प्राप्तिकर विभागाच्या पुणे कार्यालयाने पैशाचा गैरवापर रोखण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला असून, आतापासूनच पैशाच्या व्यवहारावर लक्ष केंद्रीत केले आहे. तसे आढळून आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारांकडून पैशाचा गैरवापर होऊ नये, यासाठी प्राप्तिकर विभागाने पावले उचलली आहेत. निवडणूक मुक्त आणि योग्य पद्धतीने व्हाव्यात, यासाठी प्राप्तिकर विभागाने मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत प्राप्तिकर विभागाने नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. या कक्षाच्या माध्यमातून निवडणुकीतील पैशाच्या गैरवापरावर लक्ष ठेवले जात आहे. याचबरोबर निवडणुकीतील गैरप्रकारांच्या तक्रारी नागरिकांना करता याव्यात, यासाठी टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १८००२३३०३५३ व १८००२३३०३५४ सुरू करण्यात आले आहेत.

याचबरोबर नागरिक मोबाईल क्रमांक ९४२१५४६४८४ वर संदेश, व्हिडीओ आणि छायाचित्रे व्हॉट्सऍपवर पाठवून तक्रार करू शकतात. प्राप्तिकर विभागाच्या पुणे कार्यालयाच्या अंतर्गत पुण्यासह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, अहिल्यादेवीनगर, सोलापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील नागरिक तक्रार करू शकतात. यासोबतच इतर ठिकाणीही प्राप्तीकर विभागाला सूचना देण्यात आल्या असून, त्यांनीही बारकाव्याने लक्ष केंद्रीत केले असून, संपूर्ण राज्यात प्राप्तीकर विभाग सक्रीय झाला आहे. नागरी ई-मेल अथवा पत्र पाठवूनही तक्रार नोंदवू शकतात, अशी माहिती प्राप्तिकर विभागाने दिली.

दरम्यान, महाराष्ट्र व झारखंड या दोन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा १६ ऑक्टोबरला केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. राज्यात २८८ जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. झारखंडमध्ये दोन टप्प्यांत १३ व २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांत २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असतो, त्यावर नजर ठेवली जात आहे.

पैशाच्या वाटपावर लक्ष
विधानसभा निवडणूक लागल्याने राजकीय नेते, उमेदवार मतदारांना पैशाचे वाटप करीत असल्याच्या सातत्याने तक्रारी येत असतात. त्यामुळे निवडणूक काळात आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमामात होत असतो. याला वेळीच आळा घालण्यासाठी प्राप्तीकर विभाग सक्रीय झाला असून, या पैशाच्या व्यवहारावर तसेच गैरवापरावर बारीक लक्ष ठेवून आहे. राज्यात सर्वत्र प्राप्तीकर विभागाने मोहीम सुरू केली आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR