पुणे : प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधताना राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येसंदर्भात भाष्य केले आहे. कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीमध्ये नेमके काय झाले याची माहिती देतानाच अजित पवारांनी नागरिकांनी काय काळजी घ्यावी याबद्दलची माहितीही दिली आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, शुक्रवारी १०२ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ९१४ वर पोहोचली आहे. मुंबईतील रुग्णांची संख्या ८०५ इतकी झाली आहे. राज्यामध्ये शुक्रवारी कोरोनामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या २५ वर पोहोचली आहे. हे मृत्यू सातारा, कोल्हापूर, उल्हासनगर आणि मुंबईमध्ये झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी कोणत्या नागरिकांनी अधिक काळजी घेतली पाहिजे याबद्दलची माहिती सांगितली आहे.
राज्यामध्ये शुक्रवारी सापडलेल्या १०२ रुग्णांमध्ये २७ रुग्ण मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत सापडले. त्याखालोखाल पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत २६, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, सांगली जिल्हा, सांगली महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका आणि नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीत प्रत्येकी पाच जण रुग्ण सापडले.
मालेगाव महानगरपालिका हद्दीत चार, पनवेल महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका हद्दीत प्रत्येकी तीन, नवी मुंबई महानगरपालिका, अमरावती जिल्हा, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत प्रत्येकी दोन, अकोला, नागपूर व उल्हासनगर महानगरपालिका हद्दीत प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. राज्यामध्ये शुक्रवारी चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यू सातारा, कोल्हापूर, उल्हासनगर आणि मुंबईमध्ये झाले आहेत. यातील तीन रुग्ण हृदयविकाराने त्रस्त होते. तर एका रुग्णाला मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता. या मृत्यूमुळे राज्यातील मृतांची संख्या २५ वर पोहोचली आहे.
आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात रुग्णांची संख्या वाढली आहे. सर्वांत जास्त रुग्ण केरळमध्ये बघायला मिळत आहेत. महाराष्ट्रातही आहेत पण आपल्या इथे पुण्यापुरते, पिंपरी-चिंचवडपुरते बोलायचे झाले तर सगळे कंट्रोलमध्ये आहे, असे सांगितले. पुढे बोलताना अजित पवारांनी, राज्याचा आढावा दर आठवड्याला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दिला जातो आणि आढावा घेतला जातो. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर सतत यावर लक्ष ठेवून आहेत. विविध उपाययोजना आणि प्रतिबंधात्मक कारवाई याबद्दलची बैठक घेतली होती. जिल्हा परिषदांनी काय केले पाहिजे, सिव्हिल सर्जनने काय केले पाहिजे. डीएचओ असतील आपल्या दोन्ही महानगरपालिका असतील, महापालिकेचे आरोग्य विभाग असतील या सर्वांबद्दल आम्ही विभागीय आयुक्तांबरोबरच सर्व अधिका-यांची बैठक घेतली. या बैठकीत चर्चेदरम्यान त्यांनी सूचना दिलेल्या आहेत.
वयस्कर लोकांनी काळजी घ्यावी
नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही पण ज्यांचे वय जास्त आहे, वयस्कर लोक आहेत त्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. गर्दी टाळायची गरज आहे. खोकला किंवा शिंक आल्यास नॅपकिन वापरण्याची गरज आहे. अशी काळजी घेतली गेली पाहिजे, यासंदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत, अशीही माहिती दिली.