नवी दिल्ली / लातूर : प्रतिनिधी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी
राजधानी दिल्लीत ‘इंडीया आघाडी’च्या वतीने मोठे जनआंदोलन पुकारण्यात आले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या आवाहनाला प्रतिसाद
देत हजारो नागरिक व कार्यकर्ते नवी दिल्लीत एकवटले. बारामखांबा रोड ते
सर्वोच्च न्यायालय असा विराट मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात माजी
मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर
जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिका-यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन
जोरदार घोषणाबाजी केली.
देशात सुरू असलेली सरकारची मनमानी, स्वायत्त संस्थांच्या कार्यपद्धतीबाबत
निर्माण झालेली शंका आणि लोकशाही मूल्यांची होत असलेली पायमल्ली
याविरोधात हे आंदोलन झाले. जंतर-मंतरवरील या आंदोलनाला मिळालेला व्यापक
प्रतिसाद म्हणजे जनतेच्या असंतोषाचे प्रतीक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. लोकशाही, संविधान आणि जनतेचे हक्क वाचवण्यासाठीचा हा लढा
दडपशाहीने थांबणार नाही, तर दडपण्याचे प्रयत्न वाढल्यास जनआंदोलनाची ताकद
अधिक प्रखर होईल, असा विश्वास माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. राहुल गांधी यांच्या
नेतृत्वाखाली हा संघर्ष देशभर अधिक व्यापक केला जाईल, असा निर्धारही
यावेळी व्यक्त करण्यात आला.
आंदोलनातील प्रमुख उपस्थिती: या जनआंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी प्रदेश अध्यक्ष आमदार नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब
थोरात, माजी मंत्री, आमदार, गट नेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री माणिकराव ठाकरे, माजी मंत्री नितीन राऊत, कुणाल राऊत, नसीम खान, भाई जगताप, अतुल लोंढे, भानुदास माळी, उमेशराजे निंबाळकर, रविराज देशमुख, ऋषिकेश पाटील, अनिल पटेल, अनिरुद्ध बनकर यांच्यासह लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा. शिवाजी जवळगेकर, लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश देशमुख, लातूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष विष्णुदास धायगुडे, लातूर जिल्हा काँग्रेस सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी आदींसह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
















