नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अटक करण्यात आली होती आणि गेल्या महिन्यात त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावर हेरगिरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी सांगितले की, भारताने कतारमधील आठ माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांच्या फाशीच्या शिक्षेविरुद्ध अपील दाखल केले आहे. भारत कतार प्रशासनाशी संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले. भारत सरकारने त्यांच्या बचावासाठी कतार न्यायालयात दाद मागितली आहे. भारताने नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना जी फाशीची शिक्षा सुनावली त्याचा पुनर्विचार करण्यासाठी हे अपील दाखल केले आहे.
साप्ताहिक पत्रकार परिषदेत बागची म्हणाले की, या प्रकरणाची माहिती अद्याप उपलब्ध नाही. मात्र, ८ नोव्हेंबरला या भारतीयांना भेटण्यासाठी कॉन्सुलर ऍक्सेस देण्यात आला. निवाडा गोपनीय आहे आणि तो फक्त कायदेशीर टीमसोबत शेअर करण्यात आला आहे. आम्ही आता पुढील कायदेशीर प्रक्रिया पाहत आहोत. बागची म्हणाले की, आम्ही (माजी नौदलाच्या अधिकार्यांच्या) कुटुंबीयांच्या संपर्कात आहोत.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिल्लीत या कुटुंबांची भेट घेतली होती. आम्ही सर्व शक्य कायदेशीर आणि कॉन्सुलर मदत करत राहू, असे ते म्हणाले होते. या माजी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली तेंव्हा ते दहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीज आणि कन्सल्टन्सी सर्व्हिसेससाठी काम करत होते. ही एक खाजगी कंपनी आहे जी कतारच्या सशस्त्र दलांना प्रशिक्षण आणि संबंधित सुविधा पुरवते.