नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मिडल ईस्टमध्ये वाढत असलेल्या तणावाचा परिणाम आता भारताच्या अर्थव्यवस्थेवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इराण-अमेरिका संघर्ष आणि आखाती भागातील अस्थिरतेमुळे जागतिक तेल बाजारावर दबाव वाढला असून, याचा थेट परिणाम भारतासारख्या आयातदार देशांवर होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर ‘आशियाई विकास बँक’ म्हणजेच ‘एडीबी’ने भारतासाठी चिंता वाढवणारा इशारा दिला आहे.
‘एडीबी’च्या मते, मिडल ईस्टमधील संकट लांबले तर कच्च्या तेलाच्या किमती वाढू शकतात. त्यामुळे भारतात महागाई वाढू शकते आणि आर्थिक विकासदर म्हणजेच ‘जीडीपी’ वरही नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
‘एडीबी’चे मुख्य अर्थतज्ज्ञ अल्बर्ट पार्क यांनी सांगितलं की, जर मिडल ईस्टमधील संघर्ष दीर्घकाळ सुरू राहिला, तर जागतिक पुरवठा साखळीवर मोठा परिणाम होऊ शकतो. विशेषत: तेल पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यास कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढू शकतात. २०२६ मध्ये कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल ९६ डॉलरपर्यंत राहू शकते. तर २०२७ मध्येही ती सुमारे ८० डॉलर प्रति बॅरलच्या आसपास कायम राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच तेलाचे दर लवकर कमी होण्याची चिन्हे सध्या दिसत नाहीत.
भारताच्या जीडीपी वाढीवर परिणाम
कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींचा फटका भारताच्या आर्थिक वाढीलाही बसू शकतो. एडीबीने भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज कमी केला आहे. याआधी एप्रिल‘एडीबी’ने चालू आर्थिक वर्षासाठी भारताची जीडीपी वाढ ६.० टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, आता हा अंदाज ०.६ टक्क्यांनी कमी होऊन ६.३ टक्क्यांवर येऊ शकतो, असं म्हटलं जात आहे. म्हणजेच, आर्थिक वाढ पूर्णपणे थांबणार नाही, पण तिचा वेग कमी होऊ शकतो.
महागाईचा मोठा धोका
तेलाच्या किमती वाढल्याचा परिणाम केवळ जीडीपी पुरता मर्यादित राहत नाही. याचा थेट परिणाम महागाईवर होतो. अऊइ ने चालू आर्थिक वर्षासाठी भारतातील महागाईचा अंदाज मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. याआधी ४.५ टक्के महागाईचा अंदाज होता, पण आता तो वाढून ६.९ टक्क्यांवर जाऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे. म्हणजेच महागाईत तब्बल २.४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.
शेतक-यांचा उत्पादन खर्च वाढला
आंतरराष्ट्रीय बाजारात तेल-गॅस महाग झाले की त्याचा थेट परिणाम भारतावर होतो. पेट्रोल-डिझेल महागलं तर वाहतूक खर्च वाढतो. त्याचा परिणाम रोजच्या वस्तूंच्या किमतींवर होतो. याशिवाय, गॅस महागल्यास खतांचे दर वाढू शकतात. खतं महागली तर शेतक-यांचा उत्पादन खर्च वाढतो. काही शेतकरी कमी खते वापरण्याचा पर्याय निवडू शकतात, ज्यामुळे पिकांचे उत्पादन कमी होण्याची शक्यता असते. आणि उत्पादन कमी झाले की अन्नधान्य महाग होण्याचा धोका वाढतो.
मोदींच्या आवाहनामुळे चर्चा
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच नागरिकांना पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचं, एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचं आणि संसाधनांची बचत करण्याचे आवाहन केलं आहे. या आवाहनामुळे देश आर्थिक संकटाच्या दिशेने जातोय का, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, जर मिडल ईस्टमधील तणाव आणखी वाढला आणि तेलाचे दर वाढले, तर त्याचा थेट परिणाम भारतातील महागाई, अर्थव्यवस्था आणि सामान्य लोकांच्या खर्चावर होऊ शकतो.
















