नवी दिल्ली : भारताच्या स्वदेशी संरक्षण उत्पादन क्षमतेला जागतिक मान्यता मिळाली असून ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ अभियाना अंतर्गत देशाने मोठी झेप घेतली असून, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (एसआयपीआरआय) ने सोमवार दि. १ डिसेंबर रोजी जाहीर केलेल्या अहवालात जगातील टॉप-१०० शस्त्र निर्मिती कंपन्यांमध्ये भारतातील तीन कंपन्यांचा समावेश झाला आहे.
ही यादी भारताच्या संरक्षण उद्योगातील वाढत्या क्षमता आणि स्वदेशीकरणाच्या प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करते. एसआयपीआरआयचा ‘टॉप १०० शस्त्रास्त्र उत्पादक आणि लष्करी सेवा कंपन्या, २०२४’ रिपोर्ट दर्शवतो की, २०२४ मध्ये जगातील टॉप-१०० संरक्षण कंपन्यांचा एकत्रित महसूल ६७९ अब्ज डॉलर या विक्रमी पातळीवर पोहोचला. तर, अमेरिकेतील तीन प्रमुख कंपन्या लॉकहीड मार्टिन, नॉर्थरोप ग्रुमन आणि जनरल डायनॅमिक्स यांचा एकत्रित महसूल २०२४ मध्ये ३.८% वाढून ३३४ अब्ज डॉलर झाला.
टॉप-५ मध्ये ४ अमेरिकन कंपन्या
एसआयपीआरआयच्या अहवालानुसार जगातील सर्वोच्च पाच शस्त्र उत्पादक कंपन्यांमध्ये चार अमेरिकन कंपन्या आहेत. लॉकहीड मार्टिन, आरटीएक्स, नॉर्थरोप ग्रुमन आणि जनरल डायनॅमिक्स अशा आहेत. याशिवाय, ब्रिटनची बीएई सिस्टिम्स कंपनी चौथ्या स्थानावर आहे, ज्यामुळे टॉप-५ मध्ये एकमेव गैर-अमेरिकी कंपनी म्हणून तिची नोंद होते.
कोणत्या भारतीय कंपन्यांना जागतिक मान्यता?
१) हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ४४ वा क्रमांक (एलसीए तेजस फायटर जेटचे उत्पादन)
२) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) ५८वा क्रमांक (रडार आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टीम)
३) माझगाव डॉकयार्ड लिमिटेड (एमडीएल) ९१ वा क्रमांक (युद्धनौका आणि पाणबुडी निर्मिती)
अमेरिका पुन्हा एकदा अव्वल
टॉप-१०० यादीत अमेरिकेच्या ३९ कंपन्या आहेत. यापैकी ३० कंपन्यांच्या महसुलात वाढ नोंदली गेली आहे. जगभरातील संरक्षण बाजारपेठेत अमेरिकेचे वर्चस्व कायम राहिले असले, तरी भारताचा उदय आणि टॉप-१०० मध्ये तीन कंपन्यांचा समावेश ही भारतीय संरक्षण उद्योगासाठी मोठी उपलब्धी मानली जात आहे.

