नवी दिल्ली : जम्मू – जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात लष्कर-ए-तोयबाचा वरिष्ठ कमांडर मोहम्मद आसिफ उर्फ हाशिम मुसा ठार झाल्याच्या भारताच्या दाव्यावरून भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले आहेत. ३० सप्टेंबर रोजी बडगाममध्ये चकमकीत मुसा ठार झाल्याचे भारतीय लष्कराने म्हटले होते. मात्र, दुस-याच दिवशी पाकिस्तानने मोहम्मद आसिफ नावाच्या निवृत्त सैनिकाला माध्यमांसमोर आणून भारताचा दावा खोडून काढला.
भारतीय गृह खात्यानुसार, मोहम्मद आसिफ उर्फ हाशिम मुसा हा लष्कर-ए-तोयबाच्या वरिष्ठ कमांडर गटातील शेवटचा सदस्य होता. त्याचा ३० सप्टेंबरला बडगामच्या चकमकीत मृत्यू झाला. या कारवाईनंतर त्याचा मृतदेह आणि काही शस्त्रे-स्फोटके सापडल्याचे गृह खात्याने म्हटले होते. पाकिस्तानने भारताचा दावा फेटाळत मोहम्मद आसिफ नावाच्या निवृत्त सैनिकाला माध्यमांसमोर सादर केले. त्याने २०२३ मध्ये आपण पाकिस्तानी लष्करातून निवृत्त झाल्याचे सांगितले. भारताने चुकीच्या व्यक्तीची ओळख केल्याचा पाकचा दावा आहे.
मुसा होता माजी कमांडो
भारतीय सुरक्षा यंत्रणांनुसार मुसा हा पाकिस्तानी लष्कराच्या विशेष सेवा गटातील माजी कमांडो होता आणि लष्करातून निवृत्त झाल्यानंतर तो कुख्यात दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाशी जोडला गेला होता.
चार वरिष्ठ कमांडर ठार
भारतीय गृह मंत्रालयानुसार, जम्मू-काश्मीरमध्ये २०२२ पासून सक्रिय लष्करच्या चार वरिष्ठ कमांडरच्या गटातील अन्य तीन सदस्य वेगवेगळ्या कारवायांमध्ये ठार झाले आहेत. या गटाचा संबंध जम्मू-काश्मीरमधील अनेक मोठ्या हल्ल्यांशी जोडण्यात आला आहे. आता मुसा ठार झाल्याने या गटातील सर्व सदस्य मारले गेले आहेत.
कोण होता मुसा?
२०२२ पासून जम्मू-काश्मीरमध्ये हाशिम मुसा सक्रिय होता. त्याच्यावर भारतात अनेक दहशतवादी कारवाया केल्याचा आरोप आहे. २०२५ साली जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासातही त्याचे नाव प्रामुख्याने समोर आले होते.
















