दुबई : आशिया कप ग्रुप-अ सामन्यात भारताविरुद्ध पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ गडी गमावून १२७ धावा केल्या. साहिबजादा फरहानने ४० आणि शाहीन शाह आफ्रिदीने ३३ धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादवने तीन विकेट्स घेतल्या.
हार्दिक पंड्याने पहिल्या षटकातील पहिला चेंडू वाईड टाकला. पुढच्याच चेंडूवर त्याने सईम अयुबची विकेट घेतली. अयुबचा झेल जसप्रीत बुमराहने घेतला. सामन्याच्या दुस-या षटकात बुमराहने मोहम्मद हॅरिसला पंड्याकडून झेलबाद केले आणि भारताला दुसरे यश मिळवून दिले. आठव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अक्षर पटेलने झमानला तिलक वर्माकरवी झेलबाद केले. झमानने १५ चेंडूत १७ धावा केल्या. दहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अक्षरने कर्णधार सलमान अली आगाला अभिषेक शर्माकडून झेलबाद केले.
सलमानला फक्त ३ धावा करता आल्या. १३ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर कुलदीप यादवने हसन नवाजला (५) बाद केले. पुढच्याच चेंडूवर कुलदीपने मोहम्मद नवाजला (०) आउट केले. फहीम अश्रफने कुलदीपला हॅटट्रिक घेऊ दिली नाही. १७ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कुलदीपने साहिबजादा फरहानला बाद केले. फरहानने ४४ चेंडूत ४० धावा केल्या. १८ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर वरुण चक्रवर्तीने फहीम अशरफला एलबीडब्ल्यू बाद केले. फहीमने १४ चेंडूत ११ धावा केल्या. १९ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने सुफियान मुकीमला बोल्ड केले.
सूर्याने पाक कर्णधाराशी हस्तांदोलन केले नाही
नाणेफेकीनंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगा यांनी हस्तांदोलन केले नाही. दोघांनीही एकमेकांशी नजरेचा संपर्कही साधला नाही. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नाणेफेकीनंतर दोन्ही कर्णधारांनी हस्तांदोलन करण्याची परंपरा आहे.
















