35.3 C
Latur
Tuesday, March 10, 2026
Homeराष्ट्रीयभारत शांती आणि स्थैर्याच्या बाजूने

भारत शांती आणि स्थैर्याच्या बाजूने

मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या भीषण हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र चिंता व्यक्त करत शांतता आणि संवादाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून या संकटातून बाहेर पडण्यासाठी चर्चेशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, जगभरात सध्या तणावाचे वातावरण आहे. भारत नेहमीच शांतता आणि स्थैर्याचा समर्थक राहिला असून भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहे. भारत सर्व देशांसोबत सहकार्य करत संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. जेव्हा दोन लोकशाही देश एकत्र उभे राहतात, तेव्हा शांततेचा आवाज अधिक मजबूत होतो, असेही पंतप्रधानांनी नमूद केले. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर पंतप्रधान मोदींनी ही भूमिका मांडली. या भेटीदरम्यान भारत आणि कॅनडा यांच्यात युरेनियमविषयक ऐतिहासिक करारावर स्वाक्ष-या करण्यात आल्या. याशिवाय, अणुऊर्जा सहकार्य अधिक बळकट करत स्मॉल मॉड्युलर रिअ‍ॅक्टर्स क्षेत्रात दोन्ही देश संयुक्तपणे काम करणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.

भारतात हिंसाचाराची भीती; दक्षता वाढवली
इराण आणि अमेरिका यांच्यातील सुरू असलेल्या युद्धाबाबत भारत सरकार हाय अलर्टवर आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांना पत्र लिहून खबरदारी घेण्याचे आवाहन केल्याचे वृत्त आहे. या पत्रातून सांप्रदायिक हिंसाचाराच्या शक्यतेबद्दल सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या निधनानंतर, भारतातील अनेक शहरांमध्ये निदर्शने सुरू झाली. परदेशातील घटनांचा देशात परिणाम होऊ शकतो. त्यात विशेषत: धार्मिक मेळाव्यांमध्ये होणा-या वक्तृत्वाचा उल्लेख करण्यात आला होता. कायदा आणि सुव्यवस्थेचा बिघाड रोखण्यासाठी जलद गुप्तचर माहिती सामायिक करण्याची आणि वेळेवर कारवाई करण्याची गरज या पत्रात अधोरेखित करण्यात आली होती.

नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा
यापूर्वी सोमवारी मध्यरात्री पंतप्रधान मोदींनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वरील पोस्टमध्ये सांगितले की, त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवरून संवाद साधला. या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींनी लवकरात लवकर शत्रुत्व समाप्त करण्याची गरज असल्यावर भर दिला.

भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी सरकार सज्ज
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, खाडी देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षित परत आणण्यासाठी केंद्र सरकार पूर्णत: सज्ज आहे. यासंदर्भात परदेशातील भारतीय दूतावास आणि मिशनशी सातत्याने संपर्क ठेवण्यात येत आहे. युक्रेनमधील संकटाच्या काळातही भारताने आपल्या नागरिकांना सुरक्षित परत आणले होते, याची आठवण करून देत त्यांनी स्पष्ट केले की, जिथे जिथे भारतीय आहेत, तिथे त्यांची सुरक्षा हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR