मुंबई : प्रतिनिधी
जागतिक वित्तीय बाजारपेठेत आर्टिफिशिअल इंटेलिजन्स(एआय) मुळे येऊ घातलेल्या मोठ्या घसरणीबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने(आरबीआय) एक गंभीर इशारा दिला आहे. जागतिक स्तरावर कॉर्पोरेट कंपन्यांच्या कमाईतील वाढीचे पुनर्मूल्यांकन आणि एआय संबंधित शेअर्सचे वाढलेले अवास्तव व्हॅल्यूएशनस यामुळे जागतिक बाजारात मोठी घसरण होऊ शकते आणि याचा थेट प्रभाव भारतीय शेअर बाजारावरही पडू शकतो असे केंद्रीय बँकेने म्हटले आहे.
आरबीआयने आपल्या ताज्या फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट (एफएसआर- आर्थिक स्थिरता अहवाल) मध्ये हा इशारा दिला आहे. आरबीआयच्या अहवालानुसार, एआय क्षेत्राशी संबंधित गुंतवणूक आता केवळ शेअर्सपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती रोखे बाजार आणि भांडवली बाजाराच्या इतर क्षेत्रांमध्येही वेगाने पसरत आहे. दक्षिण कोरिया, तैवान आणि जपानसह अनेक देशांच्या बाजारात अलीकडच्या काळात एआयशी संबंधित शेअर्समध्ये प्रचंड तेजी आणि त्यासोबतच मोठी अस्थिरता पाहायला मिळाली आहे. अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, अवघ्या मोजक्या टेक कंपन्यांच्या हातात एआयचे नियंत्रण आहे. त्यामुळे जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्था आणि त्यांच्या सप्लाय चेनचा भाग असलेल्या देशांमधील शेअर बाजाराच्या कामगिरीवर याचा मोठा प्रभाव पडत आहे.
बाजारात मोठ्या घसरणीची शक्यता
काही उदयोन्मुख बाजारपेठांमधील अलीकडची तेजी ही बाजाराच्या सार्वत्रिक मजबुतीमुळे नसून केवळ एआयशी संबंधित कंपन्यांमुळे आहे. केंद्रीय बँकेने म्हटले आहे की या कंपन्यांमधील संभाव्य शेअर्सची विक्री अमेरिकन बाजारात मोठी घसरण आणू शकते. अमेरिका हा जागतिक बाजाराचा केंद्रबिंदू असल्याने, तिथल्या घसरणीचा संसर्गजन्य परिणाम इतर देशांच्या बाजारांवरही होईल.
आरबीआयचा अहवाल काय?
कर्जाचा बोजा वाढला
एआय क्षेत्रातील मोठ्या कंपन्या त्यांचा फ्री कॅश फ्लो कमी होत असतानाही एआयच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवली खर्च करत आहेत. या खर्चासाठी गेल्या दोन वर्षांत त्यांनी बँकांकडून प्रचंड कर्ज घेतले आहे.
बँकिंग क्षेत्राला धोका
आगामी काळात हा खर्च आणि कर्ज आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर एआय आधारित मालमत्तेच्या मूल्यामध्ये घसरण झाली, तर या कंपन्यांना कर्ज पुरवठा करणा-या बँका, वैयक्तिक कर्ज संस्था आणि इतर वित्तीय कंपन्या मोठ्या आर्थिक जोखमीत अडकू शकतात.
‘एआय बबल’ फुटण्याची भीती
अमेरिकन इक्विटी मार्केटमध्ये सध्या व्हॅल्यूएशनचे मापदंड ऐतिहासिक पातळीच्या अत्यंत उच्च स्तरावर आहेत. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, अमेरिकन शेअर बाजारात जगभरातून होणारी गुंतवणूक लक्षणीयरीत्या वाढली आहे. मार्च २०२० मध्ये अमेरिकन शेअर्समधील एकूण विदेशी गुंतवणूक ७.५ ट्रिलियन डॉलर होती, ती मार्च २०२६ मध्ये वाढून तब्बल २१ ट्रिलियन डॉलरवर पोहोचली आहे.
दक्षिण कोरियातील परिस्थिती
अवघ्या एका आठवड्यापूर्वी दक्षिण कोरियाचा शेअर बाजार एकाच दिवसात १० टक्क्यांनी कोसळला होता, ज्यामुळे तिथे लोअर सर्किट लागून ट्रेडिंग थांबवावे लागले होते. एआय बबल (एआय क्षेत्रात आलेली फुगवटा सदृश तेजी) आता फुटणार, या भीतीने ही घसरण झाली होती. याचे पडसाद भारतीय बाजारासह इतर आशियाई बाजारांमध्येही उमटले आहेत.
















