23.5 C
Latur
Sunday, October 13, 2024
Homeराष्ट्रीयदुबईतील एअर शोमध्ये भारताच्या 'तेजस' आणि 'ध्रुव'चा धुमाकूळ

दुबईतील एअर शोमध्ये भारताच्या ‘तेजस’ आणि ‘ध्रुव’चा धुमाकूळ

दुबई : दुबईतील जगातील सर्वात मोठ्या एअर शोमध्ये भारताचे लढाऊ विमान तेजस आणि ध्रुव हेलिकॉप्टरने धुमाकूळ घातला. भारतीय हवाई दल सलग दुसऱ्यांदा या शोमध्ये सहभागी झाला आहे. तसेच भारताशिवाय इतर २० मोठे देश या एअर शोमध्ये सहभागी झाले आहेत. दुबई येथे १४ नोव्हेंबर पासून एअर शोची सुरवात झाली असून हा एअर शो १८ नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. या एअर शोमध्ये भारतीय हवाई दलाने आपल्या पराक्रमाचे प्रदर्शन केले आहे. यावेळी तेजसची ताकदही अख्या जगाला दिसून आली. दुबई, संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या एअर शोमध्ये तेजससोबत भारतीय हवाई दलाचे सारंग आणि सूर्यकिरण एरोबॅटिक्स संघ सहभागी झाले आहेत.

सारंग संघाचे पाच ध्रुव हेलिकॉप्टर, सूर्यकिरण संघाचे दहा हॉक्स आणि तीन तेजस तसेच हवाई दलाचे सी-१७ ग्लोबमास्टर आणि सी-१३० जे सुपर हर्क्युलस विमानेही एअर शोमध्ये सहभागी झाले आहेत. दुबईत होणाऱ्या एअर शोसाठी भारतीय हवाई दलाच्या टीमनेही भरपूर हवाई सराव केला आहे. २००५ मध्ये सारंग संघाने दुबईच्या अल ऐन ग्रांप्रीमध्ये आपली ताकद दाखवली होती. एलसीए तेजस शो दरम्यान एरोबॅटिक्स आणि स्टॅटिक डिस्प्ले या दोन्हीमध्ये भाग घेतला आहे.

तेजस आणि ध्रुवची निर्मिती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) केली आहे. आजपर्यंत एकाही तेजस विमानाचा अपघात झालेला नाही. दुसरीकडे ध्रुव हेलिकॉप्टरही अप्रतिम आहे. ही जगातील एकमेव हेलिकॉप्टर एरोबॅटिक्स टीम आहे. ध्रुव हेलिकॉप्टरही अत्याधुनिक आहे. तेजस आणि ध्रुवबद्दल बोलायचे झाले तर रात्र असो वा दिवस असो किंवा कोणताही ऋतू असो दोघांच्या ऑपरेशनमध्ये कोणतीही अडचण नाही. जगातील अनेक देशांनी ही विमाने खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले असले तरी लष्कराच्या गरजा पूर्ण झाल्यानंतरच त्यांची विक्री केली जाईल.

आक्रमणासोबतच बचाव करण्याची क्षमता
तेजस हे त्याच्या श्रेणीतील सर्वात हलके आणि लहान लढाऊ विमान असून त्याचे वजन सुमारे ६.५ टन आहे आणि वेग २ हजार किलोमीटर प्रति तास आहे. तेजस हवेतही इंधन भरू शकते. यात आठ हार्ड पॉइंट्स आहेत, जिथे बॉम्ब, रॉकेट आणि क्षेपणास्त्रे ठेवता येतात. तेजस हे मल्टीरोल एअरक्राफ्ट आहे. याचा अर्थ त्याच्यात आक्रमणासोबतच बचाव करण्याची क्षमता आहे.

ध्रुवचे एव्हियोनिक्स अप्रतिम
ध्रुव हेलिकॉप्टर १२ जणांना घेऊन जाऊ शकते. व्हीआयपी ड्युटीपासून ते रुग्णवाहिकेपर्यंत सर्व गोष्टींसाठी याचा वापर करता येईल. ध्रुवचे वजन सुमारे अडीच टन असून ते ताशी २५० किलोमीटर वेगाने उडू शकते. त्याचे काचेचे कॉकपिट आणि एव्हियोनिक्स अप्रतिम आहेत. हे वाळवंटातून उंच टेकड्यांवर उडू शकते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR