लातूर : विशेष प्रतिनिधी
जीवन विकास प्रतिष्ठानद्वारा संचलित सुशिलादेवी देशमुख निवासी मुलींचे मूकबधिर विद्यालय, सिग्नल कॅम्प, लातूर येथे गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थिनींनी विज्ञान, पर्यावरण आणि अक्षय ऊर्जेवर आधारित विविध अभिनव देखावे साकारले.
विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून सौर ऊर्जा निर्मिती, पवन ऊर्जा निर्मिती, जलविद्युत निर्मिती, बायोगॅस प्लांट, जलचक्र, कंपोस्ट खत निर्मिती तसेच विविध स्वयंचलित व पर्यावरणपूरक प्रकल्पांचे आकर्षक प्रतिकृती मॉडेल तयार केले. या देखाव्यांमधून अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर, कच-याचे व्यवस्थापन, सेंद्रिय खत निर्मिती आणि पर्यावरण संवर्धन याबाबत जनजागृतीचा संदेश देण्यात आला. या प्रकल्पांच्या निर्मितीसाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, शिक्षक शिंदे, अग्रवाल, कावळे , सुडे, इंडे, घुले, भालेकर तसेच इतर कर्मचारी यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन आणि सहकार्य केले. विद्यार्थिनींनी स्वत:च्या कल्पकतेचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर करून हे देखावे साकारल्याने विद्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या अभिनव उपक्रमाची पाहणी करून जीवन विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयसिंगराव देशमुख, सचिव धनंजय देशमुख, माजी सचिव रामानुज रांदड, माजी कोषाध्यक्ष बाबूराव सोमवंशी तसेच व्हाईस चेअरमन अशोकराव काळे संस्थेचे पदाधिकारी यांनी विद्यार्थिनींच्या कलागुणांचे व वैज्ञानिक दृष्टिकोनाचे कौतुक केले. विद्यार्थी, शिक्षक व कर्मचा-यांच्या मेहनतीचे अभिनंदन करून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थिनींच्या सर्जनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आत्मविश्वासाला चालना मिळते असे गौरवोद्गार काढण्यात आले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून विज्ञान, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत ऊर्जेचा संदेश देणारा हा उपक्रम विशेष आकर्षणाचा ठरला.
















